शक्तीची देवता हनुमान

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
21st April, 05:08 am
शक्तीची देवता हनुमान

येत्या २३ फेब्रुवारीला आपण सर्वजण श्री हनुमान जयंती साजरी करणार आहोत. आपल्या ज्या विविध देव - देवता आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी प्रदान करत असतात. आपल्याला विद्या सरस्वती देवी देते, बुद्धि दाता श्री गणेश आहे, संपत्ती ही श्री महालक्ष्मी देते, त्याचप्रमाणे रामभक्त श्री हनुमान शक्ती देणारी देवता आहे. शारीरिक शक्ती किंवा बळ असणे खूप आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे का? परकीय आक्रमणांना लढा देण्यासाठी तरुणांची शारीरिक शक्ती वाढावी म्हणून समर्थ रामदासांनी वेगवेगळ्या ठिकाणी हनुमान मंदिरांची स्थापना केली. आणि त्या मंदिरांच्या माध्यमातून तरुणांना व्यायामाचे महत्त्व व सामूहिक व्यायाम - सूर्यनमस्कार, दंड, बैठका इ. करण्यास प्रवृत्त केले. आणि बलवान तरुण पिढी घडवली. 

मारुतीरायाच्या मंदिरात आपण जातो तेव्हा उडीद घातलेले तेल मारुतीला अर्पण केले जाते. ज्यांना व्यायाम करून आपली ताकद वाढवायची आहे त्यांनी रोज आंघोळीपूर्वी पूर्ण शरीराला तेलाने मालिश करावे व आहारात उडदाचे वेगवेगळे पदार्थ सेवन करावे असाच संदेश आपल्याला या कृतीतून मिळतो. 

तेलाने मालीश केले असता आपल्या स्नायूंची ताकद वाढते, शरीराच्या प्रत्येक पेशीला रक्त पुरवठा चांगल्याप्रकारे होतो आणि त्वचा देखील नितळ व निरोगी होते. म्हणून दररोज डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत तेल लावावे.

तसेच रोज व्यायाम करावा आणि वेगवेगळे उडदाचे पदार्थ खावे. उडिद हे पौष्टिक आहे तसेच मांसवर्धक म्हणजेच मसल पॉवर वाढवणारे आहेत. व्यायाम रोज केल्यास पचन चांगले होते आणि भूक कडकडून लागते अश्यावेळी उडदाचे पदार्थ खावे.

चला तर मग या हनुमान जयंतीपासून मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा म्हणून मारुतीरायाची उपासना करून  ताकद वाढवण्यासाठी रोज व्यायाम व तेलाने अभ्यंग करण्यास सुरुवात करुया.

जय हनुमान.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य