ग्रीष्मातील आनंदमय गोष्टी

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
28th April, 07:17 am
ग्रीष्मातील आनंदमय गोष्टी

आपले भारतीय सहाही ऋतू आपल्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत असतात. त्यातील काही ऋतू हे आपले अगदी आवडते असतात, तर काही ऋतू आपल्याला अजिबात आवडत नाहीत. पण गंमत म्हणजे या प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला आवडतील अश्या काही गोष्टी ईश्वर निर्माण करत असतो.


काहींना हिवाळा खूप आवडतो, तर काहींना रिमझिम सरींचा पावसाळा आवडतो. सहा ऋतूंपैकी बऱ्याचजणांना न आवडणारा किंवा कमी आवडणारा ऋतू म्हणजे आत्ता सुरू असलेला उन्हाळा. उन्हाळा या ऋतूला संस्कृत भाषेत 'ग्रीष्म ऋतू' किंवा 'निदाघ' असे म्हटले जाते. 

उन्हाळ्यातील आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे कडक ऊन, गरमी, थकवा, भरपूर येणारा घाम, आणि त्यामुळे काटे टोचल्यासारखे येणारे घामोळे. हे सगळे जरी त्रासदायक वाटत असले तरी अनेक छान छान गोष्टी सुद्धा या ऋतूत आहेत. 

 सगळ्यात पहिली आवडती गोष्ट म्हणजे कैरी. पाणी सुटलं ना? ही नुसती फोडून मीठ, तिखट लावून खाण्याचा आनंद तुम्ही घेतला असेलच, त्याशिवाय कैरीचे तिखट लोणचे, गोड लोणचे, मुरंबा, पन्हे आहाहा! किती तरी आंबट गोड चविष्ट आरोग्यदायी पदार्थ! पण कैरी अतिप्रमाणात मात्र नाही खायची हं. जास्त कैरी खाल्ल्यास उष्णता वाढते आणि शरीरातील रक्त सुद्धा खराब होऊ शकते.

 त्यानंतर येतो फळांचा राजा आंबा. मानकुराद, हापूस, रायवळ, तोतापुरी, मालदेस, नीलम असे कितीतरी प्रकार. अतिशय रुचकर, पौष्टिक, थकवा कमी करणारा आंबा. आंबा पचायला जड आहे त्यामुळे एकावेळी खूप खाऊ नका. या उन्हाळ्यात वाटीभर आमरसात चमचाभर साजूक तूप, २ चिमुट सुंठ आणि चिमुटभर वेलची पूड घालून खावा. 

आणि मजा अशी की या ऋतूत शाळेला सुट्टी असते, त्यामुळे दिवसभर घरात बसण्यापेक्षा संध्याकाळी छान बागेत खेळू शकता, मोठ्या माणसांना सोबत घेऊन नदीत, तलावात पोहायला जावू शकता. रात्री गच्चीवर सगळे मिळून चंद्रप्रकाशात झोपण्याचा आनंद घेऊ शकता. 


विशेष म्हणजे या ऋतूत वेगवेगळी रंगीबेरंगी फुले आणि फळे सुद्धा निसर्ग आपल्याला देतो. या फुलांची सरबतं, जॅम, फळांचे ताजे रस पिऊन उष्णता कमी करू शकता. पण या फळांचे मिल्क शेक मात्र पिऊ नका कारण ते शरीराला त्रासदायक आहेत. पण चांगल्या पिकलेल्या गोड आंब्याचा शेक मात्र तुम्ही पिऊ शकता.

 चला तर मग, या उन्हाळ्यातील छान छान गोष्टी शोधुया म्हणजे उकाडा असला तरी आपल्याला निसर्गाने निर्माण केलेल्या इतर गोष्टींमुळे आनंद घेता येईल.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य