पाणी हेच जीवन!

Story: छान छान गोष्ट |
14th April, 05:15 am
पाणी हेच जीवन!

"संजू, बाळा किती वेळ तो नळ चालू ठेवला आहेस, बंद कर बघू. बघावं तेव्हा पाण्यात! साधं दात घासतानाही नळ चालू ठेवतोस, तासभर शॉवर घेतोस" पाण्यात उगीचच खेळत बसलेल्या संजूवर त्याचे बाबा तणतणत होते. "मग काय झालं पाणी वापरलं तर? आहे ना आपल्याकडे चोवीस तास पाणी, मला बाहेर गरम होतंय म्हणून मी असं पाणी-पाणी खेळतो. पाण्यात खेळताना कसं गार गार वाटतं!" बाबा म्हणाले, "अरे मिळालं म्हणून कसंही वापरावं असं थोडंच आहे!" संजू हिरमुसला होऊन पाय आपटत बाहेर आला नं घुम्यासारखा बसला. 

इतक्यात त्याची आवडती मंजूमावशी तिच्या लेकाला, रतनला घेऊन आली. मंजूमावशी रोज संजूच्या घरी कपडेभांडी करायला यायची. रतनच्या शाळेला सुट्टी पडली, नि त्याने आज तिच्यासोबत चलण्याचा हट्ट केला म्हणून त्याला घेऊन आली होती. रतनला पहाताच संजू मघाचा आपला रागोबा विसरला. संजू व रतन जवळपास एकाच वयाचे असल्याने त्यांना खेळायला, गप्पा मारायला मजा यायची. रतनची गावठाणातली भाषा संजूला फार आवडायची. संजूच्या आईने रतन व संजूला कैरीचं गारेगार पन्हं प्यायला दिलं. मावशीच्या तोंडात पान असल्याने ती पन्हं नंतर घेते म्हणाली. रतनने संजूला त्याच्या गावी शहापूरला आत्याचं लग्न आहे, खूप धमाल असणार असं सांगितलं व आत्याच्या लग्नाला येण्याचं आमंत्रणही परस्परच दिलं. 

"आईबाबा कचेरीत असणार. मला कोण आणणार तुमच्याकडे?" संजू फुरंगटून म्हणाला तशी धुणं धुवून पदराला हात पुसत असलेली मावशी हसली नि संजूच्या आईला विचारू लागली, "खरंच ताई, न्हेऊ का संजूला दोन दिवस आमच्याकडे? तिकडे आमचं शहापूर बघील, लग्नात मजा येईल त्याला." संजूच्या आईबाबांचा प्रामाणिक मंजूमावशीवर विश्वास होता. त्यांच्या घरात ती संजू जन्माला यायच्या अगोदरपासनं कामाला होती. ती त्यांना अगदी घरच्यासारखीच होती. संजूची आई म्हणाली, "सुट्टीच आहे नाहीतरी. एकटा कंटाळतो नि मग बसतो पाण्यात खेळत. जा घेऊन." 

संजू आपली छोटीशी ब्याग घेऊन रतन व मावशीसोबत तिच्या घरी गेला. तिथनं ते शहापूरला लगीनघरी गेले. मातीचं घर, समोर शेणाने सारवलेलं अंगण, कसं नीटनेटकं होतं. घर पाहुण्यांनी भरुन गेलं होतं. हळद कुटणं, तांदूळ निवडणं, जातं मांडणं... सारी कामं कशी हौसेने सुरू होती. बायामाणसं डोईवर पदर घेऊन, नाकात नथीचे आकडे मिरवीत, गीते गात होत्या. अंगणात कासारमामा आपलं बांगड्यांचं बाड घेऊन बसले होते. बाया आपली गोंदवलेली मनगटं चुड्यांनी भरून घेत होत्या.

लहान मुली, मुलं तिकडे लांब हाफशीवर जाऊन तिथेच आंघोळ करत होती. तिथेच कपडे धुणं चालू होतं. विहिरीच्या पाण्याने तळ गाठल्याने बाया लांब डोंगरात जाऊन तिथल्या झऱ्याचं पाणी स्वयंपाकासाठी आणत होत्या. साता-आठ वर्षांची मुलंही लहानमोठ्या कळश्या घेऊन पाणी भरत होती. बाग शिंपत होती, अंगण सारवत होती, मुक्या जनावरांना पाणी पाजत होती. पाण्याचा थेंबही तिथे कुणी वाया घालवत नव्हतं. बाहेर छोट्या मातीच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं होतं, लहानगी पाखरं त्यात पंख फडफडवत न्हात होती, यथेच्छ पाणी पीत होती. रतनकडून संजूला बरीच माहिती कळली. पाण्याअभावी लहानग्यांची स्वच्छता झाली नाही तर त्यांचं डोसकं कसं उवा-लिखांनी भरून जातं, गढूळ पाण्यामुळे पोरांना कावीळ, जंत होतात, जुलाब होतात हे रतनकडून त्याला समजलं. आत्याच्या लग्नाच्या वरातीत संजूही त्याच्या दोस्तमंडळींसोबत मनसोक्त नाचला. साधंच पण रुचकर असं ते लग्नातलं पंगतीभोजन यथेच्छ जेवला. मंजूमावशीने संजूसाठी एक आकाशी रंगाचा झब्बाही घेतला जो संजूला फारच आवडला. 

लग्नानंतर चारेक दिवसांनी मावशीने संजूला त्याच्या घरी पोहोचवलं. मंजूमावशीने लग्नातला लाडू-चिवडा संजूच्या आईला दिला. संजूचे बाबा कचेरीतून घरी आले तसं संजू त्यांना म्हणाला, "बाबा तुम्ही मला पाणी वाया घालवतो म्हणून रागे भरायचा तेव्हा मला तुमचा राग यायचा, पण मी मावशीच्या गावी गेलो होतो ना, तिथे पाण्यासाठी लोकांची होणारी पायपीट पाहिली. फार हाल होतात त्या लोकांचे. मी ठरवलंय, गरजेपुरतंच पाणी वापरायचं. उगा मिळतं म्हणून वाया नाही घालवायचं. आपण मातीची भांडी आणून त्यात पाणी ठेवत जाऊ, मागिलदारी."

"म्हणजे काय होईल?" बाबांनी मुद्दाम विचारलं. "अहो बाबा, आपल्यासारखीच आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या मुक्या जीवांना तहान लागते, त्यांनाही त्यांची अंग धुवावीशी वाटतात, पण त्यांना थोडीच बोलता येतं! जंगलात बरेच झरे आटतात सध्या. त्यांना पाणी कुठचं मिळायला! आपण नक्कीच त्यांना इवलीशी मदत करू शकतो." "झक्कास. यालाच भूतदया म्हणतात बरं संजूशेठ."

"अहो बाबा ऐका ना, मी गावाकडचं जीवन जवळून पाहिलं. तिकडच्या मावश्या डोक्यावर दोन हंडे, काखेत कळश्या असं एवढालं पाणी फार लांबून आणतात. त्यांचा दिवसातला बराच वेळ पाणी आणण्यात जातो. असं असताना आपण असलेलं पाणी कसंही वारेमाप वापरणं, बिनधास्त वाहू देणं हे चूक नाही का!" संजूच्या बाबांनी कौतुकाने संजूच्या पाठीवर थाप मारली व म्हणाले, "बरंच शिकून आलास तर मंजूमावशीच्या गावात अवघे चार दिवस राहून. म्हणतात ना, घरातनं बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. संजूबाळा, पाणी हेच जीवन आहे आणि त्याचा वापर आपण सर्वांनी काटेकोरपणे केला पाहिजे."


गीता गरुड