फ्लेम ऑफ फॉरेस्ट

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
16th March, 11:11 pm
फ्लेम ऑफ फॉरेस्ट

'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' हे शीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात? तुम्हाला माहीत आहे का हे नाव आहे एका फुलझाडाचं ज्याला सुंदर केशरी रंगाची फुलं फुलतात, पूर्ण झाडावर गडद केशरी रंगाची फुलं दुरून पाहिली की अग्नी पेटल्यासारखं दृश्य दिसतं म्हणून या झाडाला 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' म्हटलं जातं. या फुलांचा उल्लेख नवग्रह स्तोत्रात केलेला आहे… बघा आठवतंय का. 

पलाशपुष्प संकाशं तारका ग्रह मस्तकम्।

रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्।।

'पलाश' हे या वृक्षाचं संस्कृत नाव ज्याला आपण मराठीत 'पळस' म्हणतो. काटेसावरी सारखंच हे झाड सुद्धा आता सुरू असलेल्या वसंत ऋतूत बहरतं. काटेसावरीबद्दल गेल्यावेळी वाचलं असेल ना?? नसेल तर मुद्दाम मागच्या रविवारच्या ‘हुप्पा हुय्या’मध्ये वाचा. पळसाची फुलं, फांद्या, बिया, खोड, मूळ यांचे औषधी उपयोग आहेत. त्याशिवाय याच्या छोट्या फांद्या यज्ञामध्ये समिधा म्हणून वापरल्या जातात. 

याच्या फुलांचे सुंदर प्रयोग आपण करू शकतो. रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण. या दिवशी आपण एकमेकांना रंग लावून खूप मज्जा करतो. पण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये केमिकल्स असल्याने काहींना एलर्जी होते. त्यासाठी नैसर्गिक रंग आत्तापासून बनवायला सुरू करू शकता.

रंगपंचमीसाठी नैसर्गिक केशरी रंग असा बनवा 

पळसाची फुलं गोळा करून सावलीत सुकवून ठेवा आणि जेव्हा रंग पाहिजे तेव्हा मिक्सरमधून वाटून बारीक पूड करून घ्या. त्यात पाणी घातलं की छान केशरी ओला रंग तयार. असा नैसर्गिक रंग वापरल्याने एलर्जीही होणार नाही. चला तर मग नैसर्गिक रंग बनवायच्या तयारीला लागा. या ऋतूचा उकाडा कमी करण्यासाठी या फुलांचे रंगीत सरबत देखील बनवता येते. या फुलांचे सरबत प्यायल्याने उष्णता कमी होते. गरमीमुळे होणारे त्रास लघवीला होणारी जळजळ, पोटात-छातीत होणारी जळजळ, डोकेदुखी यामध्ये हे सरबत उपयोगी आहे.

त्यासाठी लागणारे साहित्य :-

सुकलेल्या किंवा ताज्या पळसाच्या फुलांच्या स्वच्छ धुतलेल्या पाकळ्या-एक मोठी वाटी, पाणी ३ ग्लास, बडिशेप १ चमचा, खडीसाखर ४ चमचे, लिंबूरस २ चमचे.

पळसाच्या फुलांच्या पाकळ्या आणि पाणी एकत्र करून उकळवा. पाण्याला छान फिकट केशरी रंग आला की ते पाणी गाळून घ्या. खडीसाखर व बडिशेप मिक्सरमधून बारीक करून घ्या, थंड झालेल्या पळसाच्या पाण्यात हे मिश्रण घाला, तसेच लिंबाचा रस घालून ढवळा. गाळून आंबट गोड सरबत प्या. 

असे छान छान आरोग्यासाठी उपयोगी असे पळसाच्या फुलांचे प्रयोग मित्र मैत्रिणींसोबत मिळून करा.


वैद्य कृपा नाईक