रामनवमी, हनुमान जयंती आणि सुंठवडा

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
14th April, 06:22 am
रामनवमी, हनुमान जयंती आणि सुंठवडा

सर्वांनी गुढी पाडवा साजरा करून आपल्या भारतीय नवीन वर्षाची छान सुरुवात केली आहे. परीक्षाही संपल्या आहेत त्यामुळे मज्जाच मज्जा आहे. या उन्हाळी सुट्टीत गुढी पाडव्यानंतर येणारा पहिला उत्सव म्हणजे श्री राम नवमी आणि त्यानंतर आपण साजरा करणार आहोत हनुमान जयंती. 

यंदा तर हे दोन्ही उत्सव आपल्यासाठी खूप खास आहेत, कारण तुम्हाला माहीत आहेच ना, प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत विराजमान झाले आहेत. त्यामुळे मोठ्या उत्साहाने आपण हे दोन्ही उत्सव साजरे करूया. 

या दोन्ही उत्सवांमध्ये दिला जाणारा प्रसाद म्हणजे सुंठवडा, त्याबद्दल आज आपण विशेष माहिती बघुया.

रामनवमी आणि हनुमान जयंती हे दोन्हीही उत्सव चैत्र महिन्यात येतात. चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे आपल्याला सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे आजार होण्याची शक्यता असते. आणि हे आजार होऊच नयेत किंवा ज्यांना झाले आहेत त्यांना लगेच त्यातून आराम वाटावा म्हणून हा खास प्रसाद सुंठवडा सगळ्यांना दिला जातो. 

सुंठवड्याचे घटक कोणते?

१.सुंठ २.धणेपूड ३.खोबरे ४.ओवा ५.खडीसाखर

यामध्ये सुंठ विशेष आहे, संस्कृत मध्ये सुंठीला 'विश्वभेषज' असे नाव आहे. म्हणजेच विश्वातील अनेक आजारांवर सुंठ हे उत्तम औषध आहे. कफ कमी करणारी, भूक वाढवणारी, दोष कमी करणारी, रुची वाढवणारी आहे. जिभेवर ठेवल्या ठेवल्याच सुंठ आपले औषधी काम सुरू करते...म्हणजे बघा किती पॉवरफुल आहे सुंठ. सुंठवडी सुंठ आल्यापासून बनवली जाते माहित आहे ना? आणि गंमत म्हणजे आले उष्ण आणि पित्त वाढवणारे आहे पण आल्यापासून तयार केलेली सुंठ मात्र उष्ण असून सुद्धा पित्त वाढवत नाही.  

धणेपूड, ओवा हे सुद्धा अपचन, पोटात दुखणे, सर्दी यामध्ये उपयोगी आहेत. 

खोबरे आणि खडीसाखर थकवा दूर करणारे आणि ताकद वाढवणारे पदार्थ आहेत. या ऋतूत उष्णता खूप वाढते ती खडीसाखर खाल्ल्याने कमी होते. 

आपल्या ऋषिमुनींनी किती छान युक्ती वापरली आहे ना, रामनवमीच्या दिवशी सुंठवडा खायला सुरुवात करावी आणि रोज १/४ -१/४ चमचा जेवणानंतर वसंत ऋतू संपेपर्यंत रोज खायचा आणि निरोगी रहायचं. 

सुंठवड्याचे फायदे तुमच्या ओळखितल्या सर्वांना सांगा आणि मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करा.

तुम्हा सर्वांना निरोगी व आनंदी आयुष्य मिळावं ही प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य