मुंग्यांनी घेतला चंदूशी पंगा !

Story: छान छान गोष्ट |
06th April, 11:21 pm
मुंग्यांनी घेतला चंदूशी पंगा !

चॉकलेट्स फार आवडायची, चंदूला. चंदूचे काका, मामा, आत्या त्याला भेटायला आले की हमखास त्याच्यासाठी चॉकलेट्स आणत. मग काय? चंदूची मजाच मजा. चॉकलेट्स खायचा नि त्यांची रंगीत वेष्टणं मात्र इथंतिथं टाकायचा. चंदूची आई मग केर काढताना वैतागायची. टेबलाखाली वेष्टणं, पलंगाच्या कडेला वेष्टणं. उचलून उचलून तिची बिचारीची कंबर दुखू लागायची. चंदूला चॉकलेट खाऊन झालं की वेष्टन कचऱ्याच्या टोपलीत टाक म्हणून सतराशे अठ्ठावन्न पाचशे अठ्ठेचाळीसवेळा सांगून झालं पण चंदू ऐकेल तर शपथ!

हीच गोष्ट रव्याच्या, बेसनाच्या लाडवाची. या गोडघाशाला लाडू फार फार आवडायचे पण प्लेटीत घेऊन एका जागेवर बसून खाईल तो चंदू कसला! या खोलीतून त्या खोलीत पळत, अधेमधे लाडवाचा घास गट्टम करताना बराचसा लाडू खाली पडायचा. आई बिचारी पुन्हा फरशी पुसायची.

एकदा काय झालं, चंदूची मावशी आजारी पडली नि तिची देखभाल करायला चंदूच्या आईला आठवडाभरासाठी तिकडे दूर जयसिंगपूरला मावशीच्या सासरी जावं लागलं. चंदूलाही नेलं असतं सोबत पण एवढे दिवस शाळा कशी चुकवणार! जाण्यापूर्वी चंदूच्या आईने बरीच तयारी करून ठेवली होती. दोन स्टीलच्या डब्यांत मुगाचे नि बेसनाचे लाडू भरून ठेवले होते. फ्रीजमध्ये त्याची आवडती डेअरी मिल्क, फाईव्ह स्टार, स्नीकर्स, मंच, पर्क... अशी बरीचशी चॉकलेट्स आणून ठेवली होती. पोळीभाजीवाली काकू येऊन पोळ्या करून जाणार होती. दुपारच्या वेळात चंदूचे बाबा दुकानातून घरी यायचे तेव्हा दुपारी चंदू बाबांच्या देखरेखीखाली रहाणार होता. संध्याकाळी खेळून आल्यावर बाबा येईस्तोवर मात्र त्याला एकटं रहावं लागणार होतं. तो वेळ टिव्ही बघत कसाच जाणार होता. काही लागलं, दुखलं तर सांगायला शेजारच्या पाचपांडे काकू होत्याच. 

चंदूची आई एकदाची मावशीकडे गेली. चंदू घरी आला तसं बाबांनी त्याला दहीभात जेवायला वाढला. ताटं घासली नि जरा अंग टेकलं. इकडे चंदूची वळवळ सुरू झाली. फ्रीजमधून चॉकलेट्स काढून खात होता, वेफर्सचं पाकीट फोडून दिवाणावर लवंडलेल्या अवस्थेत वेफर्सचा फन्ना उडवून झाला. बाबा उठले तसंं त्यांनी चंंदूला दूध गरम करून दिलं. त्याला मैदानात खेळायला सोडून ते दुकानात गेले.

चंदू तासभर खेळून घरी आला. त्याने फ्रीजमधलं संत्र्याच सिरप काढून सरबत बनवलं. सरबत पित पित सोफ्यावर बसून कार्टून पाहू लागला. मध्येच त्याला लाडवांची आठवण आली. लादीवर लोळत लाडू खात खात गोष्टीचं पुस्तक वाचणं चालू होतं. यथेच्छ चरून झालं तसं तो बेडवर अभ्यासाला जाऊन बसला तर हाताला, पायाला खाज उठू लागली, खाजवलं तर भगभगू लागलं, लाल गांधी आल्या. चंदूने पाहिलं, दिवाणाच्या खाचेतनं मुंग्यांची रांग येत होती. त्याने सकाळी टाकलेले चॉकलेटचे कण उचलून नेत होती. चादरीवर बारीक बारीक चावऱ्या मुंग्या म्हणून तो सोफ्यावर जाऊन बसला तर तिथे त्याने अर्धवट पिऊन ठेवलेला सरबताचा ग्लास कलंडला होता व त्या गोड चिकट सरबताना मुंग्या लागल्या होत्या.

जायचं कुठे!? तो सरळ लादीवर बसला. तर तिथे तर त्याने सांडलेल्या लाडवांच्या कणांना वाहून नेण्यासाठी मुंग्यांची रांग लागली होती. चंदूला वाटलं, आपल्या केसात, अंगभर मुंग्या चरताहेत, आपलं घर म्हणजे एक वारूळच आहे. तो रडवेला झाला.

पाचपांडे काकू चंदूची विचारपूस करायला आल्या. चंदूची अवस्था पाहून त्यांनी त्याला जवळ घेतलं व विचारलं, “चंदू रडायला काय झालं? आईची आठवण येतेय का?” चंदू आणखीनच जोरात रडू लागला. “मला नं मुंग्या चावताहेत. सगळीकडे मुंग्याच मुंग्या. जसं काय हे मुंग्यांचंच घर. माझं नाहीच.” चंदू हुंदके देत म्हणाला. पाचपांडे काकूंनी सोफ्यावरची, लादीवरची मुंग्यांची रा़ग, उष्टं पाहिलं. त्यांनी त्यांच्या लेकीला, पूजाताईला बोलावून चिंटूचं घर साफ करून दिलं. पूजाताईने सरबताची भांडी धुतली. केर काढला, चंदूला चॉकलेटची वेष्टनं केराच्या डब्यात टाकायला लावली. चंदूला दुसरे कपडे घालायला दिले व त्याच्या अंगाला कैलास जीवन लावून दिलं.  मुंग्यांना मारायची पावडर आणून घराच्या कानाकोपऱ्यांत मारली. 

पूजाताईने चंदूला म्हंटलं, “चंदू, हे सगळं कशामुळे झालं, ठाऊक आहे? तुझ्या गलथानपणामुळे. चंदू, अरे नीट एका जागेवर बसून खाऊ खावा. खाल्लेलं भ़ांडं उचलून विसळून ठेवावं. झोपून लाडू खाल्ला की मुंग्या अंगावर असे लाडू उमटवतात बघ. त्या तर अशा इथेतिथे कचरा टाकणाऱ्या मुलांना चावायची संधी शोधतच असतात.” चंदू म्हणाला, “पूजाताई, आता ना तू बघच. मी एकाही मुंगीला आमच्या घरात फिरकू देणार नाही. खाताना काळजीपूर्वक खाईन, सांडलवंड करणार नाही, झालीच तर ओल्या फडक्याने पुसून काढेन, मग बघतो मुंग्या येतातच कशा! आता तर ना या मुंग्यांची खैरच नाही! चंदूशी पंगा घेतात काय!”

चंदूचं ते ध्यान पाहून पूजाताई खळखळून हसू लागली. वेडा पोग्गा म्हणत तिने चंदूचा गालगुच्चा घेतला.


गीता गरुड