आला उन्हाळा! हवा गारवा!

Story: छान छान गोष्ट |
28th April, 06:14 am
आला उन्हाळा! हवा गारवा!

“नंदू, ए नंदन..आई कुठे गेला गं नंदन.” नंदनचा मामा नंदनला शोधत होता. मागीलदारी सायलीच्या वेलाजवळ  एक कट्टा बांधला होता, त्यावर शेणाने सारवलं होतं. नंदूची स्वारी तिथे बसली होती. मामा नंदूपाशी जाऊन बसला व त्याने त्याला विचारलं, “नंदू काय झालं रुसायला? आईची आठवण येतेय का? अरे कधी नाही ते तुझ्या आईने तुला एकट्याला पाठवलंय. तिची ड्युटी आहे म्हणून तुझी रवानगी इकडे. असा का बसलायस? तुला काही हवंय का?”


“मामा, अरे तुमचा फ्रीज बंद पडला. आपण आणलेला थम्सअप, मिरींडा थंड असल्याशिवाय कसं काय पिणार? शिवाय गार पाणीही नाही रे. मला ना खूप तहान लागलीय. थंड पाण्याची तहान.” मामा म्हणाला, “नंदू, तडजोड करता आली पाहिजे माणसाला. मी त्या फ्रीज दुरुस्त करणाऱ्या काकांना फोन लावला, त्यांच्या मुलीचं लग्न आहे, तेव्हा चारेक दिवसांनी येतो म्हणाले.”

“चारेक दिवस? बापरे! मग तर तू मला आईकडेच सोड.” इतक्यात मामी आली, “काही कुणी जायला नकोय आईकडे. गारेगार हवंय नं तुला. चल तर बाजूच्या भातसे काकूंच्या परड्यात.” परड्यात जाऊन बघतो तर काय, कलिंगडाची शेती. जमिनीवर वेलींच्या अधेमधे हिरवेगार कलिंगड काळ्या मातीवर विसावले होते. भातसे काकूंनी एक बरं कलिंगड काढून मामीच्या स्वाधीन केलं. नंदूची विचारपूस केली. त्याला गार पन्हं आणून दिलं. गूळ घातलेलं, वेलचीपूड, काळं मीठ लावलेलं घरच्या कैऱ्यांच पन्हं बनवून त्यांनी छोट्याशा माठात ठेवलं होतं. अप्रतिम चवीचं ते पन्हं पिऊन नंदू सुखावला, त्याला पन्हं आवडलेलं पाहून भातसे काकूंनी त्याला अजून एक ग्लास भरून पन्हं दिलं. 

दुपारी जेवणं झाल्यावर मामाने ते भलंमोठं कलिंगड सुरीने कापलं. लालेलाल कलिंगड खायला घरातली लहानमोठी सगळी जमली. साऱ्यांनी मिळून गप्पा मारत कलिंगडाच्या फोडींचा फन्ना उडवला. नंदूचं पोट तर टम्म झालं. आता त्याला मुळीच सोस लागत नव्हता. पोटात कसं गारेगार वाटतं होतं.

दुसऱ्या दिवशी मामाने माडावर चढून शहाळी काढली. शहाळ्याचं पाणी नि मऊमऊ कोवळी कोवळी पांढरीशुभ्र मलई खाताना नंदूची जणू समाधीच लागली. सकाळी मामीने गड्यांकडून आणून घेतलेले रतांबे स्वच्छ धुतले. त्यांना मधोमध कापून त्यांच्या वाट्यांत साखर भरून त्या एकावर एक रचायचं काम नंदू व मामाची लेक पर्णिका हिने आवडीने केलं. “मामी, कधी मिळणार हे कोकम सरबत प्यायला?”  “नंदूदादा, हे सरबत इंस्टंट नसतं काही. ही काचेची बरणी उन्हात ठेवायची असते. दहाबारा दिवसांनी मग गोड कोकम सरबत तयार होतं.” “पण मला आत्ताच हवंय.” नंदू कुरकुरला. इतक्यात मामी काचेच्या ग्लासातनं अमृत कोकम घेऊन आली, त्यात किंचित जिरेपूड घातली होती. रंग तर कित्ती टेम्प्टींग!

“ए आई, तू मला तुझ्या आमसुली रंगाच्या साडीचा फ्रॉक शिवलाएस नं. तो घालून मी दादासोबत भगवतीच्या मंदिरात जाणार.” पर्णिका म्हणाली. “जा पण सोबतीला शेजारच्या बंडूदादाला घेऊन जा.” पर्णिकेच्या आईची परवानगी मिळताच उन्हं उतरल्यावर नंदू, पर्णिका, बंडूदादा आणि शेजारची रमा, कौशिक, सई, आनंदा अशी सगळी गप्पागोष्टी करत रानातली वाट तुडवत, भिरभिरत्या रंगीबेरंगी सानुल्या फुलपाखरांना पहात देवळापाशी पोहोचली.

किती निरव शांतता होती देवळात! गार वारा खांबांच्या अधनंमधनं वहात होता. आजूबाजूची झाडं वाऱ्यासवे डुलत होती. वीज गेली असूनही गरम अजिबात होत नव्हतं. सर्वांनी भगवतीआईचं दर्शन घेतलं, मनोभावे नमस्कार केला, गुळखोबऱ्याचा प्रसाद घेतला. थोडावेळ देवीचं शांतगंभीर, आश्वस्थ रुप पहात बसले. मग देवळाच्या मागे गेले. तिथलं जामांचं झाडं जणू बालगोपाळांची वाटच पहात होतं. किती सुरेख बहर आला होता! पांढऱ्याशुभ्र जामांचे घोस झाडाच्या अंगोपांगी लटकले होते. बंड्याने झाडावर चढून जाम काढून खाली फेकले नि मुलांनी ते पंचात, टॉवेलात झेलले. यथेच्छ जाम खाऊन झाल्यावरच मुलं घरच्यांसाठी जामाची पोटली घेऊन घरी परतली. दुसऱ्या दिवशी बंडूदादासोबत मुलं जांभळीणीकडे रवाना झाली, लहानलहान आवळे, करवंदांचाही समाचार घेतला.

पाचव्या दिवशी फ्रीज दुरुस्त करणारे काका आले. फ्रीज सुरू झाला खरा पण नंदूने त्या मिरींडा, थम्सअपला शिवलेदेखील नाही. मामाने विचारताच म्हणाला, “या विकतच्या थंड्यापेक्षा मला भातसे काकूंच्या मातीच्या सोरकुलातलं थंडगार पन्हं, मामीच्या हातचं कोकमसरबत, नि शहाळ्याची मलई, शिवाय जाम, जांभळं, करवंदं

, आवळे अशी रसदार फळंच अधिक सरस वाटू लागलीत तेव्हा आता थंडाच्या बाटल्या आणूच नकोस.”

नंदूच्या या बोलण्यावर मामामामी दोघे खूश झाले. “इस बात पे कुछ मिठा हो जाए” म्हणत मामीने कवडीदही एका पातेल्यात घेतलं, त्यात साखर घालून रवीने घुसळून झक्कपैकी लस्सी तय्यार केली. ओठांना लावलेला लस्सीचा ग्लास नंदूने त्यातली लस्सी संपली तेव्हाच बाजूला केला नि नंदूदादाच्या अवताराला पाहून पर्णिका हसू लागली, “आई, बघ दादूला पांढऱ्या मिशा!”

“अच्छा! त्या तर तुलापण आल्यात.”

“ बघू बघू,” म्हणत दोघं आपापल्या पांढऱ्या मिशा पहायला आरशाकडे पळाली. थोडे दिवस फ्रीजशिवाय राहिला तसं नंदूला आजूबाजूच्या फळफळावळीतनं मिळणाऱ्या गारव्याचं महत्त्व कळालं.


गीता गजानन गरुड