पिवळे धमक झुंबर

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
30th March, 11:23 pm
पिवळे धमक झुंबर

तुम्ही सर्वजण परीक्षेच्या तयारीत व्यस्त असाल ना? परीक्षा संपली की मात्र मोबाईल पार्किंग करून छान निसर्गात जावून वेगवेगळी झाडं, रंगबिरंगी फुलं, पक्षी, फुलपाखरं यांच्या सोबत मज्जा करायची. आत्ता निसर्गात सुंदर सुंदर रंगांची फुलं पहायला मिळतात कारण आत्ता वसंत ऋतू आहे. वसंत ऋतूला सर्व 'ऋतूंचा राजा' म्हटलं आहे. या ऋतूत फुलणाऱ्या काटेसावर, पळस या फुलांची माहिती आपण बघितली. आज 'बहावा' या वृक्षाची माहिती पाहू. 


बहाव्याला संस्कृत भाषेत 'राजवृक्ष' असे नाव आहे, तर इंग्रजी भाषेत 'गोल्डन शॉवर ट्री' असे नाव आहे. केरळ या राज्याचं हे राज्य फूल आहे. या झाडाला छान पिवळ्या रंगाची फुलं फुलतात, या फुलांचा झुपकाच असतो आणि ती झाडाला अश्या प्रकारे लटकलेली असतात की जणू नैसर्गिक सुंदर पिवळं धमक झुंबर. 

बहाव्याला हातभर लांब शेंगा सुद्धा लागतात ज्या चॉकलेटी काळपट असतात. सुकलेल्या शेंगा हातात धरून हलवल्या की खुळखुळ्यासारख्या वाजतात. या झाडाची पाने, फुले, शेंगा, मूळ, खोड हे सगळे भाग औषधी आहेत. गंमत म्हणजे याच्या फुलांची भाजी आणि जॅम बनवून आपण खाऊ शकतो. या फुलांच्या पाकळ्या चवीला थोड्या आंबट लागतात. आता ऊन खूप वाढलं आहे, तहान खूप लागते काहीतरी थंड प्यावं असं वाटतं तेव्हा आपण या फुलांचं सरबत बनवून पिऊ शकतो. या फुलांवर इन्सेक्टीसाईड किंवा कोणतेही फर्टीलाईझर वापरले नसल्यामुळे ही फुलं सरबत किंवा भाजी, जॅम बनवण्यासाठी सेफ आहेत. 

सुट्टीतील गंमत म्हणून या फुलांचे हार, कानातले सुद्धा बनवून घालू शकतो. परीक्षा संपली की लगेचंच आई, आजी किंवा घरातील इतर मोठ्या व्यक्तीसोबत मुद्दाम बहाव्याचं झाड बघायला जा आणि याची फुलं गोळा करून गमती जमती करा. 


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य