नव वर्षाची सुरुवात करुया आरोग्यदायी

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
06th April, 11:24 pm
नव वर्षाची सुरुवात करुया आरोग्यदायी

नमस्कार! 

तुम्हा सर्वांच्या शालेय परीक्षा संपल्या असतील ना... सगळेजण मजा मस्ती करायला तयार आहातच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वजण येत्या मंगळवारी म्हणजेच ९ एप्रिलला आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत, गुढीपाडवा साजरा करून. आणि आपली न्यू इयर साजरा करायची पद्धत आनंद देणारी तर आहेच, त्याचबरोबर आपल्याला निरोगी आयुष्य देणारी सुद्धा आहे.  आपला प्रत्येक सण हा आपल्याला त्या ऋतूत होऊ शकणारे वेगवेगळे आजार होऊ नये म्हणून काय करावं हे शिकवतो. 


गुढीपाडवा या सणात विशेष महत्त्व आहे ते कडूनिंबाला. कडुनिंब असं ऐकताच आपण तोंड वाकडं करतो... ईsss किती कडू! पण तुम्हाला माहीत आहे का? चवीला कडू जरी असला, तरी कडूनिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणूनच कडुनिंबाची कोवळी पाने व कोवळी फुले, चिंच, गूळ, सैंधव, मिरी, ओवा, जिरे, हिंग हे घटकद्रव्य एकत्र करून चविष्ट चटणी बनवली जाते. आणि पाडव्याच्या दिवशी ही चटणी किंवा याच घटकांचा रस प्रसाद म्हणून सेवन केला जातो. ही चटणी किंवा रस आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. हे सेवन केले असता पोटातील जंत नष्ट होतात, भूक चांगली लागते, रक्त शुद्ध होते. 

कडूनिंबाचा वापर इतर वेळी आपण पुढीलप्रमाणे करू शकतो - 

 तुम्ही खेळताना पडून जर जखम झाला, तर जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून कडुनिंबाच्या पानांच्या काढ्याने जखम अगोदर धुवून मग मलमपट्टी करावी. 

 गरमी वाढली की घामाचे प्रमाण वाढून अंगाला खाज येते तसेच चिकन पॉक्स, सर्पीण असे रोग झाले असता कडुनिंबाच्या पानांच्या काढ्याने आंघोळ केली असता खाज, आग, कमी होते. 

 संध्याकाळी देवाला धूप अर्पण केला जातो त्यात कडुनिंबाची पाने घातली असता हवा शुद्ध होते आणि संसर्गजन्य रोग-ताप, सर्दी इ. पासून आपले रक्षण होते. 

पाडव्याला श्रीखंड खाणार असाल, तर आवडत नसली तरी सकाळी प्रसाद म्हणून कडूनिंबाची चटणी खा किंवा तीर्थ प्या. तुम्हा सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा... गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य