काँग्रेसमध्ये असतानाही प्रतापसिंह राणे यांचा होता श्रीपाद नाईक यांनाच पाठिंबा!

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा पत्रकार परिषदेतून खुलासा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st May, 12:57 pm
काँग्रेसमध्ये असतानाही प्रतापसिंह राणे यांचा होता श्रीपाद नाईक यांनाच पाठिंबा!

पणजी : माझे वडील प्रतापसिंह राणे आणि श्रीपाद नाईक यांचे नाते वेगळे आहे. काँग्रेसमध्ये असतानाही प्रतापसिंह राणे यांनी लोकसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक यांनाच पाठिंबा दिला होता, असा खुलासा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला.

पणजीत येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री विश्वजीत राणे बोलत होते. यावेळी आमदार केदार नाईक आणि भाजप सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते.

मी कालच माझ्या वडिलांसोबत बोलत होतो. त्यावेळी त्यांनी आपण काँग्रेसमध्ये असताना श्रीपाद नाईक यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले. त्यामुळेच सत्तरी तालुक्यातून श्रीपाद नाईक यांना मताधिक्य मिळत आले आहे. यावेळी देखील गोव्याच्या विकासासाठी आपला पाठिंबा श्रीपाद नाईक यांनाच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना सत्तरीतून सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा माझा विश्वास आहे, असे मंत्री राणे यावेळी म्हणाले.

माझे वडील मुख्यमंत्री असताना त्यांनी गोव्यात विकासकामे केली. त्यांनी केलेल्या कामांची छाप अजूनही गोव्यावर आहे. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचे अजूनही देशाच्या नेतृत्वाकडे चांगले संबंध आहेत. मात्र त्यांनी एक काँग्रेस नेते म्हणून नव्हे तर प्रतापसिंह राणे म्हणून गोव्याचा विकास केला. आधी प्रतापसिंह राणे होते काँग्रेस पक्ष नंतर होता, असेही ते म्हणाले.

विरोधक स्मार्ट सिटी कामांवर कॅगने ताशेरे ओढल्याचे सांगत आहेत. त्यांनी कॅगचा हा संदर्भ मला दाखवावा. तो नसेल तर त्यावर चर्चा करून उपयोग नाही. विरोधकांना वाटल्यास त्यांनी कॅगला पत्र लिहून चौकशीची मागणी करावी. कॅग अहवाल ऑडिट आणि अन्य गोष्टी तपासते. कदाचित यामध्ये काहीतरी तांत्रिक अडचणी असतील. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः लक्ष घातले आहे. त्यांनी विविध खात्यांना सूचना दिल्या असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.

सरदेसाईंनी खुशाल न्यायालयात जावे

फोंडा येथील सरकारी इस्पितळाबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले होते. ‘एकीकडे सरदेसाई मडगावमधील पब्लिक प्रायव्हेट इस्पितळाला विरोध करत आहेत. दुसरीकडे न्यायालयात जाण्याच्या बाता करत आहेत. त्यांना वाटत असेल तर त्यांनी खुशाल न्यायालयात जावे’, असे उत्तर मंत्री राणे यांनी त्यांना दिले आहे.

कोण मनोज परब ?

मी मनोज परब नामक कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही. त्यांचे नाव मी पहिल्यांदाच ऐकत आहे. माझ्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यांची यादी मोठी असते. मी त्या यादीतील नावे देखील पाहत नाही, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा