काँग्रेस सोडून भाजपमध्ये येताच स्वीकारली आरएसएसची विचारधारा : विश्वजीत राणे

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st May, 01:16 pm
काँग्रेस सोडून भाजपमध्ये येताच स्वीकारली आरएसएसची विचारधारा : विश्वजीत राणे

पणजी : मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो. तेव्हापासूनच मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) विचारधारा मनापासून स्वीकारली. तेव्हापासून माझ्या डोक्यात काँग्रेस हा विषयच येत नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

गेली आठ वर्षे मी भाजप आणि संघाचे कोणतेही काम मनापासून करत आहे. माझ्या मतदासंघांसह अन्य ठिकाणी देखील मी हिंदू ,ख्रिस्ती तसेच मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला आहे. भाजप माणुसकी म्हणून आणि समाजकारण म्हणून राजकरण करते. आम्ही समाज तोडण्याचे काम करत नाही, असे मंत्री राणे यांनी म्हटले आहे.

जेव्हा आम्ही राष्ट्रीय पातळीवरील कोअर समितीच्या बैठकीत असतो, तेव्हा आम्हाला पंतप्रधान मोदी ‘तुम्ही कोणत्या समाजाच्या उत्सवाला हजेरी लावली’, हे विचारतात. तुम्ही चर्चच्या कार्यक्रमाला गेला होता का, असेही ते विचारतात. विविध समाजाच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित रहा, असा त्यांचा आग्रह असतो, असे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपची विचारधारा घेऊनच लोकांमध्ये जातो. आम्हाला सर्व समाजातील लोकांचा पाठिंबा हवा आहे. दरवर्षी मी कार्डिनल यांना भेट देतो. त्यावेळी कार्डिनल यांना आपल्याही शुभेच्छा सांगा असे पंतप्रधान सांगतात. त्यानंतरच मी याबाबत ट्विट करतो. पंतप्रधानांचे इतर समाजाबाबत किती सूक्ष्म लक्ष असते हे यावरून समजते, असेही ते म्हणाले.