गोव्याच्या दाबोळी विमानतळापासून दिल्लीच्या शाळांपर्यंत बॉम्बस्फोटांची धमकी!

दिल्लीतील २० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी; सुरक्षा यंत्रणांनी तपासचक्रे केली गतिमान; शाळांना सुट्टी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st May, 11:32 am
गोव्याच्या दाबोळी विमानतळापासून दिल्लीच्या शाळांपर्यंत बॉम्बस्फोटांची धमकी!

नवी दिल्ली : गोव्यातील दाबोळी विमानतळासह महाराष्ट्रातील नागपूर, मध्यप्रदेशातील भोपाळ, राजस्थानमधील जयपूर यांसह अनेक विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी ईमेलद्वारे मिळाली आहे. याचा तपास सुरू असतानाच आज (ता. १) दिल्लीतील २० मोठ्या शैक्षणिक संस्थांस अनेक शाळांना अशाच धमकीचे ईमेल मिळाले. यामुळे शाळांना तत्काळ सुट्टी देण्यात आली असून सर्व सुरक्षा यंत्रणांनी तपासचक्रे गतीमान केली आहेत. दरम्यान, हे ईमेल विदेशातून आल्याचे आढळून आल्याने इंटरपोलच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा

ई-मेलवरून दाबोळी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

राजधानी दिल्ली आणि नोएडामधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्या ईमेलद्वारे आल्या आहेत. खबरदारी म्हणून दिल्ली-नोएडातील डझनभर शाळा रिकाम्या करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना वर्गातून लगेच बाहेर काढण्यात आले आहे. पोलीस, बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस सर्व मुलांना त्यांच्या घरी पाठवत आहेत. ज्या शाळांना धमक्या मिळाल्या आहेत, त्या शहरातील नामांकित शाळा आहेत. तिथे हजारो मुले शिकतात. उपराजधानीतील शाळांमध्ये असे बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ज्या तीन शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्या शाळांमधून मुलांना वर्गातून बाहेर काढण्यात आले आहे. या शाळा मयूर विहार, द्वारका आणि चाणक्यपुरी येथे आहेत. तिन्ही ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. अद्याप कुठेही काहीही सापडले नाही. मयूर विहार येथील मदर मेरी स्कूल येथेही धमकी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मदर मेरी स्कूलमध्येही मुलांच्या चाचण्या सुरू होत्या. मात्र, आज पालकांनी मुलांना शाळेत आणले असता त्यांना तातडीच्या परत पाठवण्यात आले. याशिवाय डीपीएस द्वारका आणि संस्कृती चाणक्यपुरी येथेही शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

‘या’ शाळांना मिळाले प्रथम धमक्यांचे ईमेल

१. DPS द्वारका

२. डीपीएस मथुरा रोड
३. डीपीएस नोएडा
४. डीपीएस वसंतकुंज
५. अमिटी स्कूल साकेत
६. संस्कृती शाळा चाणक्यपुरी
७. मदर मेरी स्कूल, मयूर विहार
८. हिलवूड्स स्कूल, प्रीत विहार
९. ग्रीन व्हॅली स्कूल, नजफगढ
१०. गुरु हरिकिशन शाळा
११. DAV दक्षिण पश्चिम दिल्ली

‘असा’ आला आहे ईमेल

दिल्ली-नोएडामधील शाळांना बॉम्बच्या धमक्या असलेला मेल आला असून, त्यात अत्यंत गंभीर भाषा वापरली आहे. ‘आमच्या हृदयात जिहादची आग आहे. आमच्या हातातील शस्त्र आमच्या हृदयाला आलिंगन देतो, आम्ही ते अवकाशातून पाठवू आणि तुमच्या चिंधड्या करू. आम्ही तुम्हाला आगीत झोकून देऊ. तुम्ही केलेल्या सर्व वाईट गोष्टींची उत्तरे नसतील असे तुम्हाला खरेच वाटले होते का? असे या ईमेलमध्ये म्हटले आहे.