शैलूची आई

Story: छान छान गोष्ट |
30th March, 11:21 pm
शैलूची आई

गुणाजी आणि त्याची बायको सारजा हे वरणगावातलं एक कष्टाळू जोडपं. त्यांची स्वत:च्या मालकीची शेतजमीन नव्हती. कुणी बोलावल्यावर त्यांच्याकडे मजुरीला जात. गुणाजी व सारजाचा मुलगा शैलेश हा आपल्या आजीसोबत घराकडे रहायचा. शैलेश सहा वर्षाचा झाला तसं गुणाजीने त्याला पाटी, पेन्सिल, उजळणी, दप्तर आणून दिलं. वाडीतल्या इतर मुलांसोबत हातात हात घालून शैलू शाळेत जाऊ लागला. शाळेत शिकवलेल्या कविता मोठ्या आवाजात, सुरात आईबाबांना, आजीला, गोठ्यातल्या गाईला ऐकवू लागला. आपल्या शैलूबाळाला आपण खूप शिकवायचं नि मोठा अधिकारी करायचं असं त्याच्या आईबाबांच स्वप्न होतं. शैलूची शाळेतली प्रगती वाखाणण्याजोगी होती. गुरुजी गुणाजीला  म्हणायचे, "गुणाजी, तुझा शैलू एकपाठी आहे. त्याला खूप शिकव." शैलू चौथीतनं पाचवीत गेला. आता त्याचं नाव भरणवाडीच्या शाळेत घातलं. त्या शाळेत इतर आजुबाजूच्या वाड्यांतली मुलंमुली यायची. शैलूचं हुशार मुलगा म्हणून या नवीन शाळेतले शिक्षकही कौतुक करायचे. मुलंही शैलूशी मैत्री करायला उत्सुक असायची.

एकेवर्षीचा पावसाळा गुणाजीला चांगलाच बाधला. चार महिने अंथरूण धरून होता. हातची मजुरी गेली. सारजा एकटी किती कष्ट उपसणार! तिनं परसात पालेभाज्या लावल्या होत्या. पावसानं भाज्यांचा मळा छान तरारून आला होता. एका टोपलीत भाजीच्या एवढ्या जुड्या घेऊन जाऊन विकायच्या, येताना घरासाठी लागणारा बाजार, औषधं घेऊन यायची. यात सारजेच्या मानेचा काटा ढिला व्हायचा.

शैलूच्या शाळेला लागून चार दिवस सुट्टी होती म्हणून सारजेने शैलूला सोबतीला घेतलं. एका पिशवीत दहाबारा जुड्या घालून शैलूने ती पिशवी आपल्या पाठीला मारली व आईसोबत जाऊ लागला. जांभळीच्या झाडाखाली दोघं टोपली ठेवून बसले. 

भाजी घ्या भाजी

ताजी ताजी भाजी

घ्या ना हो अण्णा

आमच्या शेतातली भाजी

गावठी भाजी ताजी भाजी

हिवीहिरवीगार भाजी

चवीला चटकदार भाजी

खाऊन तर बघा हो काकू भाजी

शैलू अगदी सुरात गिर्हाईकांना बोलावत होता. गिर्हाईकंही शैलूची आर्जवी भाषा ऐकून थांबायचे, भाजी घ्यायचे, पैसे द्यायचे नि जायचे.

बकुळा नावाची शैलूच्या वर्गातली एक मुलगी तिच्या वडिलांसोबत बाजारात आली होती. शैलूला पाहून ती चित्कारली, "अय्या, बाबा हा तर आमच्या वर्गात आहे. अय्या शैलेश तू भाजी विकतोस!" असं म्हणत तिने आश्चर्याने आपले डोळे मोठे केले. शैलेश कधी नव्हे तो भांबावला पण ती गेल्यानंतर तो परत, "ताजी ताजी भाजी... घ्या की अण्णा! परसातली भाजी..." म्हणत भाजी खपवू लागला. 

सगळ्या जुड्या खपल्या. आईच्या कनवटीला पैसे जमा झाले तसं आई म्हणाली, "खूप मेहनत केलीस आज. चल तुला जिलबी खाऊ घालते."

शैलू म्हणाला, "नको आई. आपले बापू बरे झाले ना की आपण जिलबी खाऊ. तू सध्या त्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या महागड्या गोळ्या घे बघू." आईला आपल्या एवढ्याशा पण जबाबदारीने वागणाऱ्या लेकाचं कोण अप्रुप वाटलं. 

दोन दिवसांत नवीन औषधाने गुणाजीच्या तब्येतीत सुधार पडला. शैलू शाळेत गेला. मागच्या बाकावर बकुळा बसली होती. ती शैलूकडे बोट करून मुलींना सांगत होती, "अगं ऐका नं या शैलेशला किनई मी भाजी विकताना पाहिलं. ए भाजी घ्या भाजी... ताजी ताजी भाजी... कायपण ओरडत होता!" शैलेशचा गळा भरून आला. त्याला खूप रडू येत होतं. तो शर्टाच्या बाहीने आपले डोळे पुसत होता.

गुरुजी आले. त्यांनी हजेरी घेतली व शिकवायला सुरूवात करणार तोच दारात शैलूची आई उभी. बकुळा मुलींना हळू आवाजात सांगत होती, "ही भाजी विकणारी बाई म्हणजेच शैलेशची आई." इतर मुलीही "अय्या..होss??" असा तिला प्रतिसाद देत होत्या. हे सारं गुरुजींच्या नजरेतून सुटलं नाही.  गुरुजींची परवानगी घेऊन सारजा आत आली. "काय काम काढलत शैलेशच्या आई?" "गुरजी ही रिंग बघा, सफेद मोत्यावाली. माझ्या टोपलीच्या बेळात आडकली हुती. तेदिशी तुमच्या शाळतली एकच पोर माज्या फाटीपाशी आलती, म्हून मला वाटलं तिची आसल, सोन्याचा हाये म्हून द्याया आले."

बकुळ धावतच पुढे आली, "अय्या माझी रिंग! हरवली म्हणून कित्ती शोधली आईने घरात." गुरुजी म्हणाले, "बकुळ, शैलूची आई भाजी विकते म्हणून शैलूला हसत होतीस नं मघा. शैलूची आई, शैलू कष्ट करतात, कष्ट करण्याची लाज कधीच बाळगू नये. मुलांनो एक लक्षात ठेवा, कोणतंही काम छोटं नसतं. शैलूची आई ही सोन्याची रिंग विकून खाऊ शकली असती पण तिने प्रामाणिकपणे बकुळची रिंग आहे असं आठवताच तिला परत केली." 

बकुळला आपण केलेल्या चेष्टेबद्दल पश्चाताप झाला. तिने सारजेची माफी मागितली. सर्व मुलांनी उभं राहून सारजासाठी टाळ्या वाजवल्या.  शैलूला आपल्या प्रामाणिक, कष्टाळू आईचा खूप अभिमान वाटला. तोही आईसाठी टाळ्या वाजवू लागला.


गीता गरुड