चिनूची पार्टी

Story: छान छान गोष्ट |
02nd February, 06:45 am
चिनूची पार्टी

‘‘ए मम्मा आपण नवीन वर्ष साजरे करायचे ना गं...? आपण थर्टी फर्स्टला पार्टी करायची ना गं? यावर्षी मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना सोबत घेऊन छान पार्टी करायची आहे हं... सांग ना गं मम्मा” चिनू बोलतच होता. त्याला मध्येच अडवत त्याची आई म्हणाली, “अरे हो हो चिनू. किती प्रश्न विचारशील? अरे बाळा हो करूया की पार्टी. आधी मला सांग तू कोणाकोणाला आणि किती मैत्रिणींना सोबत घेऊन पार्टी करणार आहेस?” आईने विचारले त्यावर चिनूने आपल्या सात-आठ मित्र-मैत्रिणींची नावे पटापटा आईला सांगितली. त्यातली दोन-चार तर तिच्या वर्गातील मित्र-मैत्रिणी आणि दोन-तीन रोजच्या खेळातले म्हणजे त्यांच्या कॉम्प्लेक्समधली रोज त्याच्याबरोबर खेळणारी मुले होती. 

“चिनू एक काम करशील? संध्याकाळपर्यंत मला तुझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींच्या मम्मीचे फोन नंबर देशील?” चिनूची आई म्हणाली. चिनू एका सेकंदात होय म्हणाला आणि तो लगेच कामाला लागला सुद्धा... बरं‌ का! त्याने रात्रीपर्यंत सगळ्या मित्र-मैत्रिणीच्या आईचे फोन नंबर त्याच्या आईकडे दिले. आणि त्यावर आई म्हणाली, “अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण मजेत पार्टी रंगवूया.” त्यावर चीनू अगदी आनंदाने उड्या मारू लागला. चिनूचा आपल्या आईबाबांवर खूप विश्वास होता. ती चांगलंच करणार हे त्याला खात्रीने माहीत होतं. 

दुसऱ्या दिवशी चिनूच्या आईने योग्य वेळ पाहून सगळ्यांच्या आयांना फोन केले आणि त्यांना सांगितले की, यावर्षी आपण पार्टी आपल्या मोठ्या बंगल्याच्या गच्चीवरती करूया. आपण पार्टीच्या जेवणासाठी बाहेर हॉटेलमध्ये जायला नको कारण हॉटेलमध्ये डिसेंबर महिन्याच्या एकतीस तारखेला खूप गर्दी असते आणि त्याशिवाय बाहेरचे खाणे तब्येतीला चांगलेच नसते. शिवाय नवीन वर्षाची थर्टी फर्स्ट पार्टी म्हणून सगळ्या  खाद्यपदार्थांची किंमतही दुप्पट असते. त्यापेक्षा आपण आमच्या आपल्या टेरेसवरच (गच्चीवरच) पार्टी करूया आणि तिने सगळ्यांना सांगितले की येताना प्रत्येकीने आपापल्या मुलाच्या आवडीचा पदार्थ करून आणायचा. तो ही एक वीस-पंचवीस लोकांसाठी. 

सगळ्या आयांना चिनूच्या मम्माची ही आयडिया खूप आवडली. सगळ्यांनी आपल्या मुलांच्या कानावर ही आयडिया घातली. मुले तर आनंदाने उड्या मारू लागली आणि एकतीस तारीख कधी येणार ह्याची वाट पाहू लागली. 

३१ तारखेच्या सायंकाळी सगळी मुले त्यांच्या पाल्यांसोबत चिनूच्या घरच्या गच्चीवर जमू लागली. चिनूच्या आईने आल्या आल्या सगळ्यांना गार लिंबू सरबत प्यायला दिले. मग मुलांच्या गेम्स रंगू लागल्या. पाल्यांच्याही गेम्स झाल्या. मुलांना छान बक्षीसे मिळाली. त्यानंतर नाच, गाणी, भेंडी असे करताकरता खेळता खेळता रात्रीचे साडेदहा कधी वाजले ते कळलेच नाही. मुलांना भुकाही लागल्या होत्या. सर्वांनी एकत्र बसून सगळे आणलेले पदार्थ पोटभर खाल्ले. 

पोटात अन्न गेल्यावर मुले पेंगुळायला लागली. तसे  सगळे पालक आपापल्या मुलांना आनंदाने घरी घेऊन जायला निघाले. चिनूही खूप आनंदित होता. रात्रीचे बारा वाजेपर्यंत चिनू जागाच होता. चिनूने रात्री बारा वाजता सगळ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना, सवंगड्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा देऊनच मग चिनू आनंदाने झोपी गेला. अशी छान रंगली चिनूची पार्टी.


 सौ.शर्मिला प्रभू, फातोर्डा, मडगाव मो. ९४२०५९६५३९