तोंडात घालताच तहान भागवणारं फळ म्हणजे कलिंगड. कडकडीत उन्हाची रखरख, थकवा नाहीसा करून आपल्याला एकदम ताजंतवानं करणारं थंडगार कलिंगड. हे फळ आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. कलिंगड खाण्याचे फायदे आपण आज बघुया.
कलिंगड कधी खावे व कधी खाऊ नये?
उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल, मे महिन्यात कलिंगड खावे. तसेच ते दिवसा म्हणजे सूर्यास्तापूर्वी खावे. कारण कलिंगड पचायला जड आहे तसेच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे रात्री खाल्ले असता सर्दी, खोकला होण्याची शक्यता असते.
आत्ता फार उकाडा जरी जाणवत असला तरी आता वसंत ऋतू सुरू होणार आहे, उन्हाळा नाही. त्यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यात कलिंगड जास्त प्रमाणात व रोज खाल्ले तर सर्दी, खोकला, ताप, कानाचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच आत्ता थोडं स्वतःला एप्रिल महिन्यापर्यंत कंट्रोल करा आणि मग कलिंगडावर ताव मारा.
लघवी करताना जळजळ होत असेल, लघवी थोडी थोडी होत असेल तर कलिंगड खाल्ल्याने फायदा होतो.
उन्हाळ्यात पाणी पिऊन सुद्धा तहान भागत नसेल तर कलिंगडाच्या फोडी खाव्यात.
कलिंगड कसे व किती खावे?
कलिंगडाच्या छोट्या फोडी करून खाव्या. एकावेळी खूप जास्त प्रमाणात खाऊ नये. तसेच याचा ज्यूस पिणे टाळावे. कारण ज्यूस पिताना जास्त प्रमाणात कलिंगड पोटात जाते त्यामुळे ज्यूस पचवायला आपल्या पचन शक्तीवर ताण येतो.
तसेच कलिंगड मिल्क शेक तर अजिबात पिऊ नये कारण तुम्हाला माहीत आहे? सगळ्या प्रकारची फळं घालून केलेले मिल्क शेक म्हणजे विरुद्ध आहार. मिल्क शेक फक्त चांगल्या पिकलेल्या गोड आंब्याचा आपण पिऊ शकतो. इतर फळांचे मिल्क शेक हे आरोग्य बिघडवणारे आहेत.
चला मग, लवकर ही माहिती आपल्या मित्र, मैत्रीणींना सांगा आणि हं, बाजारात जरी बाहेरून हिरवीगार, आतून लालबुंद अशी मोह घालणारी कलिंगडं आत्ता दिसली तरी 'एप्रिल महिने तक सब्र करो' हे सांगायला विसरू नका.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य