गुजरातवर दणदणीत विजय : हिली-नताली-हरमनप्रीतची ऐतिहासिक खेळी
मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाने वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईने एलिमिनेटर सामन्यात गुजरातला ऑल आऊट करत ४७ धावा आणि ५ चेंडू शिल्लक ठेवत पराभव केला. यासह मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या संपूर्ण सामन्यात मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला.
मुंबईने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना डब्ल्यूपीएलच्या प्लेऑफमधील मोठी धावसंख्या उभारली. यानंतर गोलंदाजीत मुंबईने भेदक गोलंदाजी करत गुजरातला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
मुंबई इंडियन्स आता डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध भिडणार आहे. मुंबई संघाचे एलिमिनेटर सामन्यात सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्मात होते. त्यामुळे अंतिम सामना अटीतटीचा होणार आहे. मुंबईचा एलिमिनिटेर सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या आयपीएल संघाचे खेळाडू आणि स्टाफ तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांनी उपस्थिती लावली होती.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावली आणि संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा करत वुमन्स प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील मोठी धावसंख्या उभारली. मुंबईकडून हिली मॅथ्यूज आणि नॅट स्किव्हर ब्रंट यांनी १३३ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने २२३ च्या वादळी स्ट्राईक रेटने १२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ धावा केल्या. हिली मॅथ्यूजने ५० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या तर नताली स्किव्हर ब्रंटने ४१ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची पुन्हा एकदा शानदार खेळी केली.
गुजरातकडून दुखापत झालेल्या डिएंड्रा डॉटिनच्या जागी संघात सामील केलेल्या डॅनिएल गिब्सनच्या जागी ४ षटकांत २ विकेट्स घेतल्या तर काश्वी गौतमनै १ विकेट घेतली. संघाची कर्णधार एश्ले गार्डनर हिने तिच्या स्पेलमधील ४ षटकं पूर्ण न केल्याचा फटका संघाला बसला. गार्डनरने २ षटकांत १५ धावा दिल्या.
अंतिम सामन्यात भिडणार दिल्लीशी
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरातचा संघ १६६ धावांत गारद झाला. गुजराततर्फे डॅनिएल गिब्सनने ३४, फोबी लिचफिल्डने ३१ तर भारती फुलमाळीने ३० धावांचे योगदान दिले. मुंबईतर्फे हेली मॅथ्यूजने ३१ धावांत ३ गडी बाद केले. अमेला केरने २८ धावांत २ तर शबनीम इस्माईल आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. मुंबईने ४७ धावा आणि ५ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात त्यांची गाठ दिल्ली कॅपिटल्सशी होणार असून हा सामना रविवारी, १५ मार्च रोजी होणार आहे.