गणूच्या हट्टांचे परिणाम

Story: छान छान गोष्ट |
09th February, 05:22 am
गणूच्या हट्टांचे परिणाम

गणू या वर्षी गावातल्या जत्रेला जायला आधीपासूनच तयारी करत होता. आई बाबांना त्याने आधीच सांगितले, “मला जत्रेला न्या हा, जत्रेत मी खूप खरेदी करणार आहे, चटपटीत गोबी मंच्युरीयन खाणार आहे आणि फिरत्या मेरी गो राउंडमध्येही बसणार आहे.” आई बाबा हसले आणि त्यांनी गणूला समजवायचा प्रयत्न केला. बाबा म्हणाले, “बाबू, तू तुझ्या उपयोगात येतील अशीच खेळणी घे हो, नाहीतर तू महागातल्या गाड्या, गेम्स घेतोस आणि त्या दोन दिवसात मोडून इथे तिथे पडलेल्या असतात. त्यापेक्षा बुद्धीबळ, ब्रेनव्हीटा यासारख्या गेम्स घे. दोरी उड्या मारायची दोरी घे. रिंग घे, बॅटबॉल घे.” आई म्हणाली, “आणि बाबू ते गोबी मंच्युरीयन वगैरे अज्जिबात खायचं नाही हा! त्यात कृत्रिम रंग असतात आणि स्वच्छतेचे कुठलेच नियम असल्या जत्रेतल्या दुकानांमध्ये पाळले जात नाहीत. त्यापेक्षा आपण खाजे घेऊयात, लाडूपण घेऊयात. आलेपाकही घेऊयात.” गणूने आई बाबांच्या बोलण्यावर नाक मुरडलं आणि ‘एकदा जत्रेत मला जाऊ तर दे, मग मी मला हवा तो हट्ट करीन’ असा विचार करून तो दुसऱ्या खोलीत निघून गेला. 

जत्रेचा दिवस जसा जवळ येत होता, तसा गणू अगदी उत्साहित झाला होता. काय घ्यायचे, कसे घ्यायचे, काय खायचे याच्याविषयी त्याने सगळा विचार करून ठेवला. जत्रेचा दिवस आला तसा गणू आई बाबांसोबत जत्रेला जायला हट्ट करू लागला. “बाबू पहिल्या दिवशी खूप गर्दी असणार. आपण तिसऱ्या नाहीतर चौथ्या दिवशी जत्रेला जाऊयात हा.” असे म्हणून आई बाबांनी त्याची समजूत काढली पण तो काहीच ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हता. शेवटी रात्रीच्या वेळी बाबांचे काम संपवून ते तिघेही जत्रेला जायला निघाले. 

जत्रेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी बघून गणू घाबरला. या गर्दीत आपण हरवून जाऊ म्हणून त्याने बाबांचा हात घट्ट पकडून ठेवला. आईबाबांसोबत मंदिरात जायला म्हणून तो रांगेत उभा राहिला तेव्हा त्याने आजूबाजूला दुकाने बघितली. ओटी, अगरबत्ती, फुले वैगेरे घेऊन बसणारे दुकानवाले त्यांच्याकडे येऊन “बाय म्हजेकडली घे गो ओटी, बाबा म्हाका गिरायक घाल रे” म्हणून बसल्या जागेवरून ओरडत होते. काही त्यांच्या मागूनही येत होते. खेळण्यांची दुकाने, खाज्याची दुकाने, आकाश पाळणा, कपड्यांची दुकाने, चपलांची दुकाने, बॅगांची दुकाने पाहून गणूला कधी एकदा मंदिरात जाऊन येतोय असे झाले. 

दर्शन झाल्यावर आता गणू सुटला. हे दुकान, ते दुकान करून त्याने बाबांना हैराण करून सोडले. आईसुद्धा त्यांच्या मागून मागून जात होती. दोघांनाही त्याला आवरता येईना. शेवटी बाबांनी एका कुठल्या ते दुकानात चल म्हणून त्याला उचलून घेतले. गणूने एका दुकानाकडे बोट दाखवले. त्या दुकानात सगळी खेळणीच खेळणी होती. वेगवेगळ्या गाड्या, रिमोटवरच्या गाड्या, रेल्वे, विमान, हेलीकॉप्टर, बटन दाबले की ऐकू येणाऱ्या संगीतावर नाचणाऱ्या बाहुल्या, बटन दाबले की भुंकणारा भूभू, पोटात दाबले की म्याव म्याव करून शेपटी हलवणारी मांजर, टाळी मारली की हसणारे बाळ, वेगवेगळे बॉल, बोर्ड गेम्स... काय बघू आणि काय नको असेच होऊन गेले गणूला. सगळे बघून त्याने एका गाडीकडे बोट दाखवले. बाबांनी दुकानदार काकांना त्या गाडीची किंमत विचारली. “अडीज हजार रुपये, पण दोन हजारला न्या” असे सांगून त्याने गाडी त्यांच्या पुढ्यात ठेवली. आई बाबा दोघांनीही आ वासला. “दोन हजार??? एवढी महाग? का हो?” बाबांनी त्याला विचारताच त्याने गाडीचा रिमोट त्यांच्या हातात दिला. हे बटन दाबून बघा गाडी पुढे जाते, ते बटन दाबा म्हणजे गाडी मागे येते, हे बटन फिरवा म्हणजे गाडी गोल फिरते, हे बटण दाबलात की गाडीची मागची दारं उघडतात, हे दाबलात की पुढची...” दुकानदार काका सांगत होते आणि गणू तोंड उघडे पाडून एवढे मोठाले डोळे करून ते सगळे पाहू लागला. 

मला हीच गाडी पाहिजे असा त्याने आई बाबांकडे हट्ट सुरु केला. “खूपच महाग आहे रे बाबू ही गाडी, तुला काहीतरी खेळता येईल चांगले असे घे न!” बाबांनी आईने त्याला समजावून बघितले तर तो ऐकेना. शेवटी गणू मोठमोठ्याने रडायला लागला. सगळी येणारी जाणारी लोकं त्यांच्याकडे पाहू लागली. आई बाबा हतबल होऊन दोन हजारात ती गाडी घ्यायला तयार झाले. पुढे जाऊन गणूला गोबी मंच्युरीयनचे दुकान दिसले. त्याने पुन्हा हट्ट सुरु केला. आई बाबांनी तेही त्याला खायला दिले. नंतर त्याला आकाश पाळण्यात बसायची इच्छा झाली, तीही बाबांनी पूर्ण केली. आता दमलेला गणू घरी जाऊया म्हणून रडू लागला. तसे आई बाबांनी त्याला घरी नेले. 

घरी आल्यावर गणूच्या पोटात दुखू लागले. त्याला उलट्या, जुलाब सुरु झाले. दमलेला गणू या सगळ्या प्रकाराने कावून अजूनच रडू लागला. आईने कडू औषध देऊन त्याला जरा वेळ झोपवले. बरे वाटल्यावर गणू उठला आणि मघाची गाडी शोधू लागला. बाबांना ती चालू करून द्यायला सांगून गणूने ती चांगलीच रिमोटने पळवली. मागे पुढे गोल गोल कशीही गानू तिला जोरजोरात पळवू लागला. वेगाने पळणारी गाडी भिंतीला दोन तीनदा आपटली आणि बंदच पडली. गणूने तिला आपटली, धोपटली पण ती काही सुरु होईना. महाग असलेली गाडी आता बंद पडली म्हणून गणूला आता खूपच वाईट वाटले. त्याला पुन्हा रडू आले. रडत रडत तो आईच्या कुशीत शिरला. आपली चूक झाली हे त्याने आईकडे कबूल केले. “मोठ्यांचे ऐकावे रे बाबू... नको नको म्हणताना तू मघाशी गोबी मन्च्युरीयन खाल्लास आणि पुन्हा ते खाऊन आकाश पाळण्यात पण नको म्हटले असताना बसलास. घरी येऊन झाला ना त्रास? एवढी महागाची गाडी घेतलीस, तीही बघितलीस ना कशी वापरलीस. त्या ऐवजी छान छान गोष्टींची पुस्तके घेतली असती, रंगपेटी घेतली असती, उरलेल्या पैश्यात गरीब मुलांसाठी वह्या पुस्तके घेऊन देता आली असती. थोडीशी का होईना, कुणाला तरी मदत झाली असती. तुझ्या वर्गातल्या नितीनकडे वह्या नसतात ना, त्याची आई आपल्याकडे कामाला यायची, ती पडल्यामुळे तिचे कामही बंद आहे. तू त्याला मदत करू शकला असतास की नाही?” 

गणूला आता अजूनच वाईट वाटले. त्याने रडत रडत आईला मिठी मारली आणि असे पुन्हा तो कधीही करणार नाही हेही त्याने आईला कबूल केले. त्याची चूक त्याला कळली होती. आईने गणूला जवळ घेतले आणि तिने “माझा शाणा बाबू तो” म्हणत त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. 


 स्नेहा सुतार