ऋतूराज वसंत आला...

वसंत ऋतू हा सहाही ऋतूंमधील सर्वांत सुंदर ऋतू. म्हणूनच या वसंत ऋतूला 'ऋतूराज' म्हणजेच सर्व ऋतूंचा राजा असे म्हटले आहे.

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
02nd March, 04:42 am
ऋतूराज वसंत आला...

तुम्हा सर्वांना माहीत आहेच की आपल्या भारतात सहा ऋतू आहेत. आणि या सहा ऋतूंपैकी सध्या सुरू असलेला ऋतू म्हणजे वसंत ऋतू. या ऋतूची सुरुवात झाली आहे हे निसर्ग आपल्याला सांगत असतो. कसं बरं हा ऋतू सुरू झाला आहे हे आपल्याला निसर्ग सांगतो?? 

  •  सगळ्यात आधी आपल्याला पहाटे कोकिळेचे मंजूळ सूर ऐकू येतात. 
  •  रंगीबेरंगी फुले आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दिसतात. अतिशय सुंदर अशी ही सावरीची, पळसाची, पांगाऱ्याची फुलं, सुरंगीची, बकुळीची सुगंधी फुले ही आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. आंब्याच्या, काजूच्या झाडाला मोहोर आलेला दिसतो. 
  •  वातावरणातील गारवा कमी होऊन उष्णता खूप वाढते.
  •  वेगवेगळी रसरशीत फळं जसे की कलिंगड, टरबूज बाजारात येतात.
  •  वसंत ऋतूत उष्णता भरपूर वाढलेली असते, त्यामुळे शरीरातील कफ पातळ होऊन सर्दी, खोकला, अजीर्ण यासारखे आजार होतात. तसेच वेगवेगळे त्वचेचे रोग सुद्धा होऊ शकतात. 
  •  वसंतात महाशिवरात्री, होळी, रंगपंचमी, चैत्र पाडवा, हनुमान जयंती इ. विशेष सण - उत्सव साजरे केले जातात. 

सर्वांचा आवडता असा हा ऋतू. तुम्हाला माहीत आहे का?? भगवान् श्रीकृष्णांनी भगवतद्गीतेत असं म्हटलं आहे की ‘ऋतूनां कुसुमाकरः।’ सर्व ऋतूंमध्ये मी कुसुमाकर म्हणजेच वसंत ऋतू आहे. वसंत ऋतू हा सहाही ऋतूंमधील सर्वांत सुंदर ऋतू. म्हणूनच या वसंत ऋतूला 'ऋतूराज' म्हणजेच सर्व ऋतूंचा राजा असे म्हटले आहे. 

अश्या या सुंदर ऋतूत आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या बरं. आणि त्यासाठी गर्मी वाढली आहे म्हणून लगेच आईस्क्रीम, ज्यूसेस, ऊसाचा रस, मिल्क शेक्स, फ्रीज मधले पाणी पिऊ नका. माठातले पाणी घालून बनवलेले लिंबू सरबत, कोकम सरबत थोडे थोडे पिऊ शकता. भजी, मिरची, समोसा यासारखे तेलकट पदार्थ खाऊ नका त्याऐवजी पॉप कॉर्न, साळीच्या - ज्वारीच्या लाह्या, चुरमुऱ्या, फुटाणे असे भाजलेले पदार्थ खाऊ शकता. गव्हाचा फुलका आणि वेगवेगळ्या चटण्या पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता चटणी असा चविष्ट आहार घ्या. 

आनंद देणारी रंगपंचमी नैसर्गिक रंग वापरून करा. या ऋतूतील वेगवेगळ्या फुलांची ओळख करून घ्या. वेगवेगळी रंगीबेरंगी, सुगंधित फुले देवपूजेत, गजरे-वळेसर बनवून केसात माळण्यासाठी, घराच्या सजावटीसाठी वापरा. निसर्गात वेळ घालवा आणि या ऋतूचा आनंद घ्या.

आला आला
ऋतूराज वसंत आला


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य