अजू बदलतो...

Story: छान छान गोष्ट |
16th February, 03:55 am
अजू बदलतो...

शाळेची बस घरासमोर थांबली. रोजच्या प्रमाणे अजू ओरडत ओरडत घरात शिरला. अर्थात रोजचाच प्रकार त्यात नवल नाही. पण आज विषय मात्र वेगळा होता. रोज दुपारी शाळेतून आल्यावर आई भूक लागली, भूक लागली म्हणून धोशा लावणारा अजू आज मला कॅम्पला जायचंय, कॅम्पला जायचंय म्हणून मागे लागला होता. अगदी तहान भूक विसरून.

थोडे दटावून शांत केले. व्हायचे काय की, शाळेतून घरी आलेला अजू गडबड करू लागला की त्याला आमचा डॉगी सॅम आणि बोका गोचुही सामील होत. नुसता कल्ला उठे घरात पाच मिनिटे तरी. त्या गडबडीत दप्तर एकीकडे, बूट दुसरीकडे तर कपडे आणि कुठे, काही पत्ताच नसे. रोजच्या प्रमाणे सगळीकडे पसारा झाल्यावर अजुला जेवायला वाढले. जेवतानाही कॅम्पला जायचंय ही भूणभूण चालूच होती. अर्थात पोट भरल्यानंतर त्यात थोडा थंडावा आला. सॅम आणि गोचूही पोट भरल्यावर बाहेर जाऊन बसले.

जरा शांततेनंतर विचारले, तर म्हणतो कसा, “आई आज मॅडमने सांगितले की शाळेचा कॅम्प जाणार आहे. दोन दिवसांचा, साखळीला अनाथ आश्रमात. नावे द्यायला सांगितली आहेत आणि मी जाणार आहे.”

“काय? दोन दिवस?” मी ओरडलेच. दोन दिवस म्हणजे एक रात्र अजू घराबाहेर राहणार! कसं शक्य आहे? ज्याला प्रत्येक कामाला आई, बाबा लागतात, एकही वस्तू जागेवर न ठेवणारा, शाळेत जाताना पुस्तके न सापडणारा, आठवड्यातून एकदोन तरी वॉटर बॅग, टिफीन विसरून येणारा अजू आता दोन दिवस कॅम्पला जाणार? अहो ज्याला घरात पाणी प्यायचा पेला कुठे ठेवतात ते माहीत नाही, ज्याला रोज सकाळी जबरदस्ती उठवावे लागते शाळेत जाण्यासाठी तो कँपच्या शिस्तीत कसा राहील? हा प्रश्न होता मला. पण अजू ऐकत नव्हता. 

शेवटी न राहून टीचरला फोन केला. सगळे म्हणणे ऐकल्यावर टीचर हसली म्हणाली जवळजवळ ९० टक्के आयांची हीच तक्रार आहे. आणि म्हणूनच हा कॅम्प आयोजित केला आहे. तुम्ही पाठवा बिनधास्त. जीवातजीव आला थोडा, तरी मन साशंक होतेच. अर्थात सेफ्टीकरिता नाही पण अजूच्य  वेंधळेपणाकरिता, केअरलेस स्वभावाकरिता.

संध्याकाळी बाबांना विचारले, त्यांचे काय, ते रोजच्या प्रमाणे अजूच्या बाजूने. शेवटी ठरले बाबा एकदाचे. आठ दिवस आधीपासून तयारी चालू. पण ऐन वेळेस रुमालच नाही, टोपीच नाही. शेवटी सगळं निस्तरून बसले बाबा महाराज बसमध्ये.

दोन दिवस कसे गेले कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता बस परतली शाळेत. आम्ही वाट पाहत होतो. म्हटले झाला सुरू आता गोंधळ. अरे! पण हे काय? अचंबित झालो आम्ही! नेहमीप्रमाणे पिकनिकहून आरडाओरडा करत येणारी पोरं आज बऱ्यापैकी शांत. लाईन लावून उतरली काय, सर्वांचं सामान व्यवस्थित काय? विश्वासच बसेना. अजू घरी आला. जरा शांतच वाटत होता. आल्यावर बूट, सॉक्स काढले, नीट रॅकवर ठेवले. कपडे काढून धुवायला टाकले, शांतपणे चहा घेतला. मी, बाबा, गोचू, सॅम सगळेच थंड.

घरी आल्यावर अजू सगळ्या कँपाच्या गोष्टी सांगायला लागला. म्हणाला, “आई खरेच दोन दिवस राहिलो गं अनाथाश्रमात त्या मुलांबरोबर. ना आई, ना बाबा त्यांना. सगळे स्वतःचे स्वतः करतात गं, कपडे धुतात, आंघोळ स्वत: करतात, आपले कपडे नीट लावतात, ताट कसे सगळे पुसून जेवतात. अभ्यासाच्या वेळी अभ्यास, खेळाच्या वेळी खेळ. कोण नाही गं त्यांचे लाड करणारे. पाहिजे ते आणून देणारे. मी ज्या मुलासोबत राहिलो ना, त्याने तर मोबाईलला अजूनपर्यंत हात सुद्धा लावला नव्हता आई.” अजू म्हणाला. “खरेच, आपली जबाबदारी, आपले काम आपण करावे. स्वावलंबन म्हणजे काय हे मी ह्या दोन दिवसात शिकलो. आजपर्यंत कसलीच कदर नाही केली. नव्हे, तसा विचारच नाही केला आई, पण आता मात्र मी स्वावलंबी बनणार आणि बघ तू पाहतच राहशील आता.”

बारा वर्षाच्या अजूत दोनच दिवसात झालेला बदल मी बघत होते. सागरही पुस्तकाच्या आडून डोके बाहेर काढून मंद हसत होता. आज महिना झाला, पण अजू बदलला तो बदलला. सगळे शांतपणे आवरून शाळेत काय जातो, शांतपणे वाढलेले जेवतो काय पूर्णपणे. अहो अजूच काय आमचा सम आणि गोचूसुद्धा दंगा न करता जेवतात आता. पण मी? अजूनही अंगवळणी पडत नाही हो, अजूनही स्कूल बसची वेळ झाली की मनात पहिला विचार येतो, चला कल्ला स्टार्ट आता! काय करणार? एवढ्या वर्षाची सवय इतक्या लवकर जाते का?


रेशम जयंत झारापकर ,
मडगाव