एक होती मुलगी. तिचं नाव होतं रिना. ती खूप आळशी होती. ती अंघोळ करत नव्हती, ब्रश करत नव्हती, केस विंचरत नव्हती... काहीच करत नव्हती. ती आळशी होती म्हणून तिच्याशी कोणच बोलत नव्हते आणि कोणाच खेळत नव्हते. एक दिवस ती आपल्या मैत्रिणींबरोबर खेळायला गेली. मैत्रिणींनी तिला खेळायला घेतलंच नाही म्हणून ती निराश होऊन एका मोठ्या दगडावर बसली.
तेवढ्यात तिला झाडावर एक पोपट दिसला. ती पोपटाला म्हणाली, “अरे पोपटा, चल आम्ही दोघंही खेळू.” पोपट म्हणाला, “शीऽऽऽ मी अश्या घाणेरड्या मुलांबरोबर खेळत नाही. मी स्वच्छ मुलींबरोबर खेळतो.” असे ऐकून ती खूप निराश झाली. नंतर तिला एक मांजर दिसली. रिनाने तिलाही विचारलं, “अगं मांजरी, तू माझ्याबरोबर खेळायला येशील का?” मांजर म्हणाली, “शीऽऽऽ तू बघ किती घाणेरडी आहेस आणि मी बघ किती स्वच्छ आहे. मी माझ्या जिभेने माझे अंग चाटते आणि तू बघ अंघोळ पण करत नाहीस. मी नाही खेळणार तुझ्याशी.” हे ऐकताच तिला खूप वाईट वाटले.
नंतर तिला एक डुक्कर दिसला. तो चिखलात लोळलेला होता. तो डुक्कर तिला म्हणाला, “अगं माझ्याबरोबर तू खेळायला येशील का? बघ आम्ही दोघेही एकदम सेम सेम दिसतोय.” हे ऐकताच ती म्हणाली, “शीऽऽऽ मी नाही येणार..” असं म्हणून रिना धावत पळत आपल्या घरी गेली. तिने अंघोळ केली, ब्रश केला, केस विंचरले आणि पळत पळत आईकडे गेली. आईने बघितलं आणि ती आश्चर्यचकित झाली व म्हणाली, “अगं रिना तू आज मला एकदम स्वच्छ कशी दिसतेस?” रिना हसत म्हणाली, “आई मी आता स्वच्छ राहणार. रोज अंघोळ करणार, ब्रश करणार, केस पण नीट विंचरणार. मी कधीच घाणेरडी वागणार नाही.” हे ऐकताच तिची आई आनंदित झाली. मग रिना बाहेर गेली. तिच्या मैत्रिणींनी तिला बघितले व तिच्या मैत्रिणी आनंदी झाल्या. नंतर ती सगळीजणं खेळायला लागली. मग त्यांच्यासोबत पोपट, मांजर, कुत्रा, गाय व गावातल्या बकऱ्यासुद्धा खेळू लागल्या.
मैथिली भोसले, शाळा : डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, अस्नोडा