पणजीत आजपासून संगीत, नृत्यासह अस्सल काजूवर ताव मारण्याची संधी

‘गोवा वन विकास महामंडळा’चा तीन दिवसीय काजू महोत्सव आजपासून होणार सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 12:56 pm
पणजीत आजपासून संगीत, नृत्यासह अस्सल काजूवर ताव मारण्याची संधी

पणजी : कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर तीन दिवसीय भव्य काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ‘गोवा वन विकास महामंडळा’ने आयोजित केलेला हा महोत्सव अविस्मरणीय अनुभव, परंपरा, संस्कृती आणि सामुदायिक सशक्तीकरण यांचे मिश्रण ठरणार आहे. या महोत्सवात संगीत, नृत्य आणि काजू आधारित खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

यंदाचा हा महोत्सव ‘सीझन2’ आहे. हा काजू शेतकरी आणि स्थानिक समुदायांसाठी आशेचा किरण आहे. आकर्षक कार्यक्रम आणि उपक्रमांसह, गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करताना स्थानिक व्यवसायांना, विशेषत: महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण स्वयं-सहाय्य गटांना सक्षम बनवण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

पारंपरिक काजू प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकांपासून ते पन्नासपेक्षा जास्त फूड स्टॉल्सवर काजू-आधारित स्वादिष्ट पदार्थांची चव चाखता येणार आहे. शिवाय, हा महोत्सव गोव्याच्या काजू उद्योगासाठी शाश्वत विकासाची दिशा ठरणार आहे. तांत्रिक सत्रे आणि चर्चांद्वारे शेतकऱ्यांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी, शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि काजू उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केले जाणारआहेत. या महोत्सवात ध्वनी भानुशाली, अखिल सचदेवा आणि ॲश किंग यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांचे आकर्षक परफॉर्मन्स होणार आहेत. यंदाच्या महोत्सवात ट्रूब्लू, क्रिमसन टाईड आणि मार्क रेव्हलॉन यांसारखे प्रशंसित राष्ट्रीय आणि गोव्यातील बँड सादर करणार  आहेत.

उत्सवाचे मुख्य आकर्षण निःसंशयपणे सन डाउन इव्हेंट असेल. जेथे उपस्थितांना जाझ जंक्शन, ॲनिका प्रोजेक्ट आणि ज्यूक बॉक्स ट्रिओसारख्या सुप्रसिद्ध बँडच्या तालावर ठेका धरता येईल. डीजे हर्षा, डीजे अफरोज आणि डीजे अझीम देखील महोत्सवात सूर भरणार आहेत. आमच्या सोबत या महोत्सवात सामील व्हा, असे आवाहन मंडळाने केले आहे.