गोव्यातील खास भिण्णा

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
05th May, 04:37 am
गोव्यातील खास भिण्णा

मस्त सुट्टी एन्जॉय करत आहात ना तुम्ही सर्वजण? आंबे, फणसाचे गरे, करवंदं, जाम या फळांवर छान ताव मारत असाल. आमरस, रसाळ गऱ्यांची भाकरी (धॉणस), फणसाचे साठ, आंब्याचे साठ, आंब्याची वडी, मँगो कुल्फी, लस्सी, आम्रखंड, आंब्याचे रायते/सांसव असे कितीतरी चविष्ट पदार्थ या ऋतूत घरी बनवले जातात. हे सर्व पदार्थ पचवायला आपल्या पचन संस्थेला मदत करणारी अजून एक स्पेशल गोष्ट या ऋतूत निसर्ग निर्माण करतो. सांगू शकता का ती स्पेशल गोष्ट कोणती आहे ते??? खाजवा खाजवा जरा डोकं... 

लाल-लाल, गोल-गोल, आंबट-आंबट, फोडताच बोटं लालबुंद करणारे कोकम. आपल्या गोव्यातील खास भिण्णा. संस्कृत भाषेत कोकमाला 'वृक्षाम्ल' असे म्हटले जाते. 

तुम्ही सर्वांनी बघितले असेलच आपल्याकडे विविध सण किंवा लग्न समारंभाला जेवणानंतर सोलकढी प्यायला देतात. जेवणानंतर सोलकढी का बरं देत असतील? सणा-समारंभाचे जेवण म्हणजेच वेगवेगळी पक्वान्नं, ती खाल्ली की पोट जड होतं. ओवा, हिंग आणि आमसूल घालून केलेली सोलकढी प्यायली की पोट हलकं होतं म्हणजेच पचन नीट होतं. अजीर्णामुळे पोटात दुखत असेल तर सोलकढी प्यायल्याने पोटदुखी सुद्धा थांबते. 

उन्हाळ्यात कोकमाचे सरबत सुद्धा बनवले जाते. कोकम फोडून आतला गर, बिया काढून घ्याव्यात आणि लाल लाल कोकमाच्या वाट्यांमध्ये साखर भरून त्या वाट्या एका काचेच्या बरणीत एकावर एक ठेवाव्या आणि डबा बंद करून उन्हात ठेवावा. रोज सकाळी सर्व मिश्रण हलवून बरणी परत उन्हात ठेवावी. ४-५ दिवसांनी साखर छान विरघळते व पाक तयार होतो. तयार झालेले सरबत गाळून घेऊन त्यात चवीपुरते सैंधव व जिरेपूड घालावी. आवश्यकतेनुसार त्यात माठातले पाणी घालून चविष्ट सरबत प्यावे. 

सुरण, अळू या भाज्यांमुळे खाज येऊ नये म्हणून त्या शिजवताना आमसूल म्हणजेच सोलं घातली जातात. तसेच जेव्हा पिताम येऊन अंगावर चट्टे उठतात आणि खूप खाज येते त्यावेळी कोकम मिक्सरवर वाटून खाज येणाऱ्या भागांवर लावले असता खाज कमी होते. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी तर मुद्दाम सोलकढी प्यावी कारण कोकम हे जाडी कमी करायला मदत करते. 

चला मग, या सुट्टीत कोकमाचं झाड बघा, कोकमापासून आमसूलं कशी बनवली जातात ते बघा आणि सोलकढी, सरबत बनवून प्या.  या कोकमाच्या बियांपासून तेल सुद्धा काढले जाते. हे तेल इतर तेलांसारखे पातळ नसते, हे तेल घट्ट असते म्हणून याला कोकम बटर असे सुद्धा म्हटले जाते. पोळी - भाकरीला हे बटर लावून खाऊ शकता. घरातील मोठ्या माणसांच्या पायांना भेगा पडल्या असतील तर इतर कोणत्या क्रीमपेक्षा कोकम बटर थोडं गरम करून रोज लावल्याने भेगा भरून येतात. एका फळाचे कितीतरी उपाय! म्हणूनच कोकमाची सोलं, आगळ, सरबत घरोघरी असतंच. 

कोकमाचे हे सर्व फायदे आपल्या मित्र मैत्रिणींना जरूर सांगा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य