बिरबलाची हुशारी

Story: छान छान गोष्ट |
12th May, 06:37 am
बिरबलाची हुशारी

ना सुणी गुणीनं वेत्ति गुणागुणीषु मत्सरी।

बादशाहाच्या दरबारी असणाऱ्या बिरबलाच्या हजरजबाबीपणापुढे किंवा त्याच्या बुद्धिचातुर्यापुढे आदरानं मान झुकवावी असंच त्याचं व्यक्तिमत्व होतं. पण त्याची ही हुशारी, कर्तबगारी अनेकांच्या डोळ्यात खूपत असे. बादशाहाकडून त्याचा होणारा मान-सन्मान, त्याला दिली जाणारी शाबासकी भर सभेत त्याचं केलं जाणारं कौतुक अनेकांना सहन होत नसे. एकदा एक मोठा कट बिरबलच्या विरुद्ध शिजत होता. काय होता हा कट?

बादशाहाच्या दरबारात गुणी कलावंत, विद्वान अशा अनेकांचा सत्कार-सन्मान होत असे. अशाच एका बहुरुप्याचा सत्कार बादशाहाच्या दरबारात करायचा असे ठरले होते. बहुरूप्याचा कार्यक्रम बादशाहाच्या दरबारात होणार आहे ही बातमी अगदी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. हा बहुरूपी कोण आहे? त्याचा शोध घ्यावा, त्याला भेटावे आणि आपला हेतू त्याला सांगावा असे बिरबलाचे जे मत्सरी होते त्यांना वाटले आणि थेट बहुरूप्याकडे गेले. त्याची भेट घेतली. बहुरुपी आपल्या कार्यक्रमाची तालीम करीत होता एवढ्यात ही मंडळी तिथे पोहोचली. "वा! वा! काय सुंदर हुबेहुब असं बैलाचं सोंग घेतलं आहे हो आणि ती शिंगं तर धारदार टोकेरी दिसतायत. खरा बैलसुद्धा तुमच्यापुढे फिका पडेल." बहुरूपी आपली स्तुती ऐकून पुढे आला. आपण केलेली बैलाची वेशभुषा बाजूला केली आणि म्हणाला, "आपण माझी स्तुती केलीत, हे ऐकून फार बरं वाटलं. आपण कलेची कदर करणारे दिसता." त्यावर बिरबलाचे मत्सरी म्हणाले, "आम्ही तर आपल्या कलेची कदर करणारे आहोतच पण आता आमची नजर फक्त तुमच्यावरतीच आहे. तुम्हीच आमचं काम तडीला नेऊ शकाल."

"काम? कसलं काम?" "काम अगदी साधं आहे. तुमच्या बहुरुपी कपड्यांचाच फायदा घेऊन आमचं हे काम तुम्ही फत्ते करायचं आहे. उद्या तुम्ही बादशाहाला बहुरूप दाखवणार आहात त्या बहुरुपांमध्ये तुम्ही आता तालीम करीत होतात तो बैल पण दाखवणार आहात बरोबर ना?" "हो! माझ्या संपूर्ण बहुरूपण कार्यक्रमाचं खास आकर्षण आहे." "शाब्बास! आता आम्ही सांगतो ते नीट ऐका. आम्ही तुमच्यावर एक फार मोठी जबाबदारी सोपविणार आहोत ती जर तुम्ही पार पाडलीत, तर तुमच्या सात जन्माचं कल्याण होईल एवढी मालमत्ता आम्ही तुम्हाला देऊ." बहुरूप्याने थोडा विचार केला. आपल्या जन्माचं कल्याण होणार या आशेवर त्यानं ते मान्यही केलं. 

दुसऱ्या दिवशी बहुरूपी आपल्या साधन सामुग्रीसह राजदरबारात आला. सुरुवातीला दोनचार वेगवेगळी सोंगं घेतली आणि मग बैलाचं सोंग घेतलं. बाद‌शहाच्या दरबारात खराच बैल आला आहे की काय असं वाटण्यासारखं सोंग होतं ते. चारपाच वेळा हा बैल इकडे तिकडे नाचला आणि मग एकदम उधळलेल्या, पिसाळलेल्या बैलासारखा जोरात शिंगे हालवत उड्‌या मारू लागला. दरबारात टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. बेगम बादशाहा या सोंगावर खूश होत होती, "बहोत अच्छा! बहोत अच्छा! और करो! और करो!" बहुरूप्याला चांगली दाद मिळत होती. बिरबलाचे मत्सरी आनंदाने नाचत होते. शेवटी बहुरूप्यानं आपलं तोंड बिरबलाच्या दिशेने वळवलं आणि जोरात जाऊन बिरबलाला ढुशी मारायला लागला. 

बिरबलाच्या लक्षात आला बहुरुप्याचा कपटीपणा. बिरबलानं त्याच्या दोन्ही शिंगाना घट्ट पकडलं "बैला आता शांत हो, नाही तर मी तुला सिंहाचे रूप दाखविन" बहुरुप्याच्याही लक्षात आलं. त्यानं आपलं बैलाचं सोंग आवरतं घेतलं. झालं बहुरूप्याचा कार्यक्रम संपला. बादशाहा-बेगमनं त्याचं खूप कौतुक केलं. त्याला शाबासकी दिली. बिरबलनही त्याचं कौतुक केलं. "तुमच्या सर्व सोंगातलं मला बैलाचं सोंग फार आवडलं. तुम्ही सर्व प्रकारची हुबेहुब सोंगं वटवता. प्रत्येक सोंगात तुम्ही जिवंतपणा आणता. उद्या तुम्ही मला असं एक सोंग वठवून दाखवाल का?" बहुरूपी म्हणाल "कुठलं सांगा?" "काही नाही, सोंग अगदी साधं आहे. आम्ही उद्या एक चिता रचणार आहोत, त्या चितेवर तू अगदी मेल्यासारखं म्हणजे प्रेतासारखं झोपून रहायचं. आम्ही ज्यावेळी तुला ऊठ म्हणू त्यावेळी तू उठायचं." "बस! एवढंच??" बहुरूपी म्हणाला, "ठीक आहे." दुसऱ्या दिवशी स्मशानात चिता रचली गेली. त्यावर बहु‌रुप्याला प्रेताचं सोंग घेऊन झोपायला सांगितलं. बहुरूपी झोपला. बिरबल म्हणाला, "ज्यावेळी मी तुझी वेळ सुरू झाली असं म्हणेन त्यावेळी तू श्वास रोखायचास आणि ज्यावेळी श्वास घे म्हणू त्यावेळी घ्यायचा." बिरबलानं बाजू‌ला चितेला अग्नी लावण्याकरिता एका माणसाला हातात चुडी देऊन उभं केलं. आणि त्याला सांगितलं की मी ज्यावेळी तुला चिता पेटव म्हणेन त्यावेळी तू अग्नि लावायचास. झालं!. बहुरूप्याला श्वास रोखण्यास सांगितलं, बहु‌रूप्याने श्वास रोखला. थोडावेळ झाला. लोक टाळ्या वाजवू लागले. बिरबलाने चुडीवाल्याला सांगितलं, "घे ती चुडी आणि लाव चितेला आग" हे शब्द बहु‌रुप्याच्या कानावर पडले. त्याबरोबर "मेलो मेलो वाचवा!" असं म्हणत तो चितेवर उठून बसला. बिरबल म्हणाला, "हे कसले रे तुझं प्रेताचं सोंग मी तुला ऊठ म्हणण्याअगोदरच तू उठलास? म्हणजेच तू खरा बहुरूपी नाहीस." बहुरूपी म्हणतो, "मी खरा बहुरूपी आहे." "मग जर तू खरंच बहुरूपी आहेस तर मग काल माझ्या पोटात तू खऱ्या बैलाची जोरात शिंग का खुपसत होतास? काय विचार होता तुझा सांग? तुला ही दुर्बुध्दी कोणी दिली?" त्यावर बहुरूपी म्हणाला, "आपला मत्सर करणाऱ्या लोकांनीच हे कपट कारस्थान रचलं. माझ्या सात जन्मांचं कल्याण करण्याचं त्यानी मला आश्वासन दिलं." "बहुरुप्या आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत अशा कूटकारस्थांनाना, आश्वासनाना बळी पडू नकोस. कलेची जोपासना प्रामाणिकपणे कर त्यातच तुझं कल्याण आहे."


रामकृष्ण अनंत गर्दे