नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप; वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, पुनाळेकर निर्दोष

तब्बल ११ वर्षांनंतर पुण्यातील सीबीआय विशेष न्यायालयाचा निवाडा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 12:05 pm
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप; वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, पुनाळेकर निर्दोष

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात पुण्यातील सीबीआय विशेष न्यायालयाने पाच आरोपींपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. यात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. तर डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पु्नाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. तब्बल ११ वर्षानंतर या हत्या प्रकरणातील निकाल आज जाहीर झाला आहे.
आरोपींच्या वकिलांचे म्हणणे...
निकालानंतर डॉ. दाभोलकर यांचे पुत्र हमीद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. प्रत्यक्ष मारेकऱ्यांना शिक्षा झाली. जे सुटले त्यांच्याविरोधात आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ. या कटामागे जे सूत्रधार होते, मूळातला जो सूत्रधार आहे, त्याला अटक झालेली नाही. या बाबींविरोधात आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रत्यक्ष मारेकऱ्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली ही समाधानाची बाब आहे. ज्या तीन जणांना शिक्षा झालेली नाही त्यांच्याविरोधात आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ११ वर्षांनंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय मिळतो, ही भावना आमच्या मनात निर्माण झालेली आहे. ज्यांना सोडले, त्यांना कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडले ते अजून कळालेले नाही. कारण निकालाची प्रत हातात आलेली नाही. पण जे संबंधित होते, त्यांना ८ वर्षे तुरुंगात राहावे लागले आहे. ती शिक्षा त्यांना मिळालेली आहे. पण आम्ही याविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाऊ’, असे मुक्ता यांनी म्हटले आहे. यामागचा मास्टरमाईंड अजून सापडलेला नाही. हा व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे. तो कोण ते सीबीआयने शोधणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
आरोपींचे वकील साळशिंगीकर यांनीही प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी व्यक्त करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५ लाखांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा वाढेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. विक्रम भावे, संजीव पुनाळेकर, डॉ. वीरेंद्र तावडे यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या केसमध्ये पुणे पोलीस, क्राईम ब्रँच आणि सीबीआय यांची वेगवेगळी थिअरी राहिली आहे. आज दोघांना शिक्षा दिली असली, तिचा आदर करतो. निकालाची प्रत हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास करणार आणि नक्कीच उच्च व सर्वोच्च न्यायायलात दाद मागणार, असे साळशिंगीकर यांनी म्हटले आहे.