ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पोस्टरद्वारे बदनामी; मडगावात एकावर गुन्हा नोंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 11:34 am
ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पोस्टरद्वारे बदनामी; मडगावात एकावर गुन्हा नोंद

मडगाव : येथील ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची प्रतिमा खराब होईल, अशा आशयाचे पोस्टर लावून बदनामी केल्याप्रकरणी श्रीराम रायतूरकर यांच्याविरोधात मडगाव पोलिसांत गुन्हा नोंद झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेलता थिएटरजवळ राहणारे रहिवासी सागर गस्ते यांनी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे. ‘संशयित श्रीराम रायतूरकर यांनी आमदार कामत यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स ६ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खारेबांध येथील हॉटेल तंदूरजवळील रेल्वे उड्डाणपुलावर व फूट ब्रीजवर लावले. त्यावर आमदारांनी घोटाळे केल्याचे आक्षेपार्ह लिखाण होते. याशिवाय संशयिताने समाजमाध्यमांवरही ते पोस्टर व्हायरल केले’, असे गस्ते यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

मडगाव पोलिसांनी तक्रारीचा तपास करून संशयित श्रीराम रायतूरकर व इतरांविरोधात बदनामी करणे व सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा