आगामी निवडणुकांसाठी भाजपा-एनडीए सज्ज

पंतप्रधान मोदी : तिसऱ्या कार्यकाळात गरिबी, भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा होणार अधिक तीव्र

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
17th March, 01:08 am
आगामी निवडणुकांसाठी भाजपा-एनडीए सज्ज

दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल २ महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार असून सात टप्प्यात मतदान होणार अाहे. १९ एप्रिलपासून निवडणुकांना सुरुवात होईल आणि ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी तिसऱ्यांदा पुन्हा आपण सत्तेत येऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सणाला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपा-एनडीए या निवडणुका लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. सुशासन आणि सार्वजनिक सेवेच्या आमच्या रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांमध्ये जाऊ. १४० कोटी कुटुंबातील सदस्य आणि ९६ कोटी मतदारांचे पूर्ण स्नेह आणि आशीर्वाद आपल्याला सलग तिसऱ्यांदा मिळतील, असा मला विश्वास आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, १० वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देश आणि नागरिक इंडिया आघाडीच्या चुकीच्या कारभारामुळे त्रस्त होते. असे एकही क्षेत्र नव्हते जिथे घोटाळा सुरू होता. देश निराशेच्या गर्तेत गेला होता आणि जगानेही भारतावर विश्वास ठेवणे सोडले होते. त्या परिस्थितीतून आम्ही देशाला बाहेर काढले आणि आज भारत झपाट्याने प्रगती करत आहे. १४० कोटी देशवासीयांच्या सामर्थ्याने आणि शक्तीने आपला देश दररोज विकासाचे नवे विक्रम रचत आहे. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि करोडो भारतीय गरिबीतून बाहेर आले आहेत. आपल्या सरकारच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या आहेत. आम्ही १०० टक्के देशवासीयांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे आणि त्याचे परिणाम आमच्यासमोर आहेत.
मोदी म्हणाले, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशासाठी खूप काम करायचे आहे. अनेक दशके राज्य करणाऱ्यांनी निर्माण केलेली खोल दरी भरून काढण्यात आपली गेली १० वर्षे गेली. या १० वर्षांत आपला भारतही समृद्ध आणि स्वावलंबी होऊ शकतो, असा विश्वास देशवासीयांना मिळाला आहे. आमच्या पुढील कार्यकाळात या संकल्पांच्या पूर्ततेचा मार्ग मोकळा होईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधिक तीव्र होणार आहे. सामाजिक न्यायासाठी आमचे प्रयत्न आणखी वाढतील. आम्ही वेगाने भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू. तरुणांची स्वप्ने साकार करण्यासाठी आमचे प्रयत्न अधिक ताकदीने पुढे जातील. प्रामाणिक, दृढनिश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार किती काही करू शकते याची जाणीव आज प्रत्येक भारतीयाला होत आहे. त्यामुळेच आपल्या सरकारकडून प्रत्येक देशवासीयांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. म्हणूनच आज भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि समाजाच्या प्रत्येक घटकातून ४०० के पार हा एकच आवाज ऐकू येत आहे.
आज विरोधकांकडे ना मुद्दा आहे ना दिशा. आम्हाला शिव्या देणे आणि व्होट बँकेचे राजकारण करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. त्यांची कौटुंबिक मानसिकता आणि समाजात फूट पाडण्याचे कारस्थान जनता आता नाकारत आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे त्यांना लोकांशी संपर्क साधता येत नाही. अशा लोकांना जनता कधीच स्वीकारणार नाही. _ नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हेही वाचा