सद्गुरु जग्गी वासुदेव यांची ब्रेन सर्जरी

प्रकृती चांगली असल्याचे इस्पितळाकडून स्पष्ट

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st March, 12:14 am
सद्गुरु जग्गी वासुदेव यांची ब्रेन सर्जरी

पणजी : ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील अपोलो इस्पितळात ब्रेन सर्जरी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे इस्पितळाकडून स्पष्ट करण्यात आले. 

सद्गुरूंना गेल्या चार आठवड्यांपासून तीव्र डोकेदुखी होती. तीव्र वेदना होत असतानाही, त्यांनी त्यांचे कार्यक्रम आणि काम चालू ठेवले. ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री इव्हेंट सुद्धा पार पाडला. त्यांची डोकेदुखी १५ मार्च रोजी दुपारी दिल्लीला पोहोचल्यावर अधिक तीव्र झाली. न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या सल्ल्यानुसार त्याच दिवशी दुपारी ४. ३० वा. त्वरित एमआरआय करण्यात आला, ज्यामध्ये मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे समजले. त्यामध्ये यापूर्वी ३-४ आठवड्यांसाठी आणि तपासणीनंतरच्या २४-४८ तासांमध्ये तीव्र रक्तस्त्राव झाल्याचे समजले.

सद्गुरूंना त्वरित रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. पण ते म्हणाले की, मी गेल्या ४० वर्षांमध्ये एकही बैठक चुकवली नाही. तीव्र वेदना होत असतानाही, त्यांनी १५ मार्चच्या सर्व निर्धारित बैठका पार पाडल्या. 

१७ मार्च २०२४ रोजी सद्गुरूंच्या मज्जासंस्थेची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. डाव्या पायाची शक्ती कमी होऊ लागली, आणि पुन्हा पुन्हा उलट्या होऊ लागल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. सी.टी. स्कॅनमध्ये मेंदूची सूज पुष्कळ वाढलेली दिसली आणि मेंदू एका बाजूला कलण्याची जीवघेणी परिस्थिती दिसून आली.

सद्गुरूंची काळजी डॉक्टरांची एक टीम घेत होती. यात डॉ. विनीत सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चॅटरजी होते. १७ मार्चला त्यांच्यावर मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावाचे रक्त काढून टाकण्यासाठी त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली. सद्गुरूंना शस्त्रक्रियेनंतर हळूहळू व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले.

सद्गुरूंच्या प्रकृतीत प्रगती दिसत आहे, असे डॉ विनीत सुरी यांनी सांगितले.

हेही वाचा