अन्सोळेतील जिलेटीन स्फोटानंतर सत्तरीतील बेकायदा चिरेखाणी बंद

अनेकांचे जबाब पोलिसांकडून नोंद : चिरेखाणींवर झाडाझडती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th April, 12:13 am
अन्सोळेतील जिलेटीन स्फोटानंतर सत्तरीतील बेकायदा चिरेखाणी बंद

वाळपई : अन्सोळे येथे ८ एप्रिल रोजी जिलेटिनचा मोठा स्फोट घडून आल्यानंतर सत्तरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणींचा व्यवसाय तूर्तास तरी पूर्णपणे बंद झाला आहे. स्थानिक पोलिसांनी अनेक ठिकाणी झाडाझडती घेतल्यावर बेकायदा चिरेखाण व्यवसाय बंद करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

वाळपई पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ८ रोजी झालेला स्फोट जिलेटिनमुळे झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्या संदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी नासिर हुसेन जमादार याच्याकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. जिलेटिनचा साठा आणलेल्या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात अनेकांची नावे समोर आली आहेत. त्यांना लवकरच जबाबासाठी बोलविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सत्तरी तालुक्यात जवळपास सर्वच पंचायत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाण व्यवसाय सुरू आहे. या चिरेखाणींवर मोठ्या प्रमाणात जिलेटिनचा स्फोट करून हा व्यवसाय सुरू होता. या प्रकरणामुळे सध्या पोलिसांवर दबाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी अनेक ठिकाणी छापा घालून हा व्यवसाय पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे सत्तरी तालुक्यातील अनेक चिरेखाणींवर सध्या सामसूम आहे. सध्या हे प्रकरण ताजे असल्यामुळे पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. मात्र, वातावरण निवळल्यानंतर पुन्हा एकदा या चिरेखाणी सुरू होण्याची शक्यता आहे.

जिलेटिनचे कनेक्शन सावंतवाडीशी!

जिलेटिन स्फोट संदर्भात आतापर्यंत अनेकांचे जबाब घेण्यात आले. जिलेटिनचा साठा कोणाकडून आणला याचा तपास सुरू असून त्यांनाही माहितीसाठी बोलविण्यात आले आहे. या जिलेटिनचा साठा विकत घेण्यासाठी सावंतवाडीपर्यंत कनेक्शन असल्याचे दिसत आहे. सावंतवाडीतून संबंधितांना बोलावून त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. जिलेटिनचा व्यवहार झालेल्या व्यक्तींची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.