अन्सोळेतील स्फोट प्रकरणी नासिर जमादारच्या कोठडीत वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th April, 11:55 pm
अन्सोळेतील स्फोट प्रकरणी नासिर जमादारच्या कोठडीत वाढ

वाळपई : अन्सोळे येथे जिलेटिनचा स्फोट करण्यात आल्यानंतर संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या नासिर हुसेन जमादार याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जिलेटिनचा स्फोट झाल्यानंतर नासिर हुसेन जमादार याला अटक करण्यात आली होती. त्याला वाळपई प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सदर कोठडी रविवारी संपुष्टात आली. त्याला पुन्हा एकदा प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याच्या कोठडीत आणखीन पाच दिवसांनी वाढ करण्यात आली.

या संदर्भात वाळपई पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नासिर हुसेन जमादार याच्याकडे स्फोटासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. त्याने हा जिलेटिनचा साठा कशासाठी आणला होता, कुठून आणला, या प्रकरणात कोणकोणत्या व्यक्तींचा संबंध आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

आतापर्यंतच्या तपास प्रक्रियेमध्ये अनेक वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या बॉम्ब निकामी पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यांनी नमुने गोळा केले असून तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्याच्या जिल्हा फोरेन्सिक पथकातर्फेही तपासणी करण्यात आली आहे.

नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण

स्फोटावेळी नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या संदर्भातील अहवाल लवकरच सरकारला सादर करण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.