रावणफोंड परिसरात गळफास घेत महिलेची आत्महत्या

लग्नाला सात वर्षे पूर्ण न झाल्याने प्रकरण एसडीएमकडे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th April, 12:36 am
रावणफोंड परिसरात गळफास घेत महिलेची आत्महत्या

मडगाव : रावणफोंड परिसरातील चड्डावाडो येथील भाड्याच्या घरात राहणाऱ्या ललिता पुजारी (२३) या महिलेने आत्महत्या केल्याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांकडून प्रकरण नोंद करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना समोर आली. पतीपत्नीच्या भांडणातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लग्नाला सात वर्षे पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे.

रावणफोंड सर्कलकडून सेंट जोसेफ चॅपेलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याशेजारी चड्डावाडो याठिकाणी एका भाड्याच्या खोलीत ललिता पुजारी व तिचा पती राहत होते. साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वीच त्यांनी ही खोली भाड्याने घेतली होती. दोघा पतीपत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असायची. शुक्रवारी रात्री साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास ललिता हिने आत्महत्या केल्याची माहिती तिच्या माहेरच्या मंडळींना मिळाल्यावर ती घटनास्थळी दाखल झाली. तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर करत पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत वॉशिंग मशिनवर चढून तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजले. रात्री उशिरापर्यंत मायना कुडतरी पोलीस घटनास्थळी होते. पहाटे चार वाजता मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शवागारात नेण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशी व तपासाअंती महिलेने आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. ललिताचा पती तिला माहेरच्या मंडळींना भेटू देत नसे. ललिता व पतीमध्ये सतत भांडणे होत असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित ललिताच्या बहिणीने दिली. ललिता हिच्या लग्नाला अजूनही सात वर्षे पूर्ण झालेली नसल्याने याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून तपास केला जाणार आहे.