मोपा येथे टॅक्सीचालकाला मारहाण; मध्यस्थीनंतर वादावर पडदा

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
13th April, 11:44 pm
मोपा येथे टॅक्सीचालकाला मारहाण; मध्यस्थीनंतर वादावर पडदा

कोरगाव : मोपा विमानतळावरील पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षक अधिकाऱ्याने मारहाण केल्याप्रकरणी टॅक्सीचालक दिनेश खडपे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी टॅक्सी चालकांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. मात्र, उपअधीक्षक जिवबा दळवी आणि मोपा पोलीस ठाण्यातील निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी केलेल्या शिष्टाईनंतर संध्याकाळी तक्रार मागे घेऊन प्रकरण मिटविण्यात आले.

तक्रारदार दिनेश खडपे याला पाठिंबा देण्यासाठी सुमारे १०० टॅक्सी चालकांनी मोपा विमानतळावर धडक दिली. यावेळी प्रकरण चिघळणार नाही, याची उपअधीक्षक जिवबा दळवी आणि पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी काळजी घेतली. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटांची बैठक घेण्यात आली. मारहाण करणार्‍यावर कारवाई करावी, त्या उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदाराला मारहाण केलीच नाही, असा दावा पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी केला. मात्र, तक्रारदार दिनेश खडपे म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्याने मानगुटीला पकडून माझे कपडे फाडून मारहाण केली.

भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, मोपाचे सरपंच सुबोध महाले, काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र गावकर, पेडणे मतदारसंघाचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक आदी उपस्थित होते. शेवटी पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी आणि पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी यशस्वी मध्यस्थी करून समाधानकारक तोडगा काढला. यापुढे अशा प्रकार होणार नाही, असे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले.

तक्रारदार दिनेश खडपे यांनी आपली तक्रार मागे घेतली. मात्र, यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.