शिवोलीत वैयक्तिक कारणावरून युवकावर सुरी हल्ला

हणजूण पोलिसांकडून संशयितास अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th April, 11:32 pm
शिवोलीत वैयक्तिक कारणावरून युवकावर सुरी हल्ला

म्हापसा : गुडे, शिवोली येथे वैयक्तिक कारणावरून युवकावर कोयता व सुरी हल्ल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी संशयित आरोपी चैतामणी सिमेपुरूषकर याला अटक केली.

हा प्रकार शनिवारी सकाळी ८.३० वा. सुमारास घडला. फिर्यादी दशरथ दिवकर हे घरातील कुत्र्याला घेऊन शेजारील मोकळ्या जागी जात होते. यावेळी संशयिताने त्यांना शिवीगाळ केली. याचा जाब त्यांनी विचारला असता संशयिताने त्यांच्यावर कोयता आणि सुरी हल्ला केला.

या हल्ल्यात दिवकर यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर कोयत्याचा तर पोटाच्या भागावर चाकूचा वार लागून ते जखमी झाले. शिवोली आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

घटनेनंतर फिर्यादी व त्याचे कुटुंबीय पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यावर संशयित फिर्यादींच्या घरी गेला. त्याने दिवकर यांची आई दिपाली हिला जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी संशयिताविरुद्ध भा.दं.सं.च्या ५०४, ३२४, ५०६ (२) कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस हवालदार रूपेश शेटगावकर करीत आहेत.