म्हापशात पोलिसाला मारहाण; दोघाही संशयितांना सशर्त जामीन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th April, 12:45 am
म्हापशात पोलिसाला मारहाण; दोघाही संशयितांना सशर्त जामीन

म्हापसा : आंगड - म्हापसा येथे रोड रेजवरुन एका पोलिसाला मारहाण करून त्याच्या मित्रांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या दोघाही संशयितांची म्हापसा न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली.

संशयित आरोपी जोवित कुतिन्हो (हळदोणा) व एलरिच फर्नांडिस (नास्नोळा) या दोघांना म्हापसा पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी २० हजारांची हमी रक्कम व तितक्याच रकमेच्या हमीदाराच्या हमी शिवाय पाच दिवस सकाळी १० ते १ पर्यंत पोलीस स्थानकात हजेरी लावणे व इतर अटींवर त्यांची सुटका केली.

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी पवन तिरके व राज हे दोघे अद्यापही फरार आहेत. ही घटना गुरूवार, दि. ११ रोजी उत्तररात्री १.४५ वा. सुमारास घडली होती. संशयित पवन तिरके (कार चालक) हा संशयित जोवित कुतिन्हो याच्यासोबत जीए ०३ एच ०५६९ क्रमांकाच्या स्कोडा कारमधून म्हापशाहून हळदोणाच्या दिशेने जात होता. तर जखमी मल्लेश जोडी (कार चालक) हा जीए ०३ झेड ७१३३ क्रमांकाच्या बलेनो कारमधून मित्र महेश दळवी (फिर्यादी), तेजस गुरव, शरद भातकांडे यांच्यासोबत विरुद्ध दिशेने येत होता. मल्लेश, महेश व शरद हे तिघे पोलीस कर्मचारी आहेत.

आंगड येथे अलंकार थिएटर जवळील कळंगुटकर नर्सिंग होमसमोरील रस्त्यावर स्कोडा कारची धडक बलेनो कारला बसली व अपघात घडला. या अपघातानंतर पवन तिरके व मल्लेश जोडी यांच्यात बाचाबाची व झटापट झाली. त्यानंतर संशयित पवन तिरके याने फोन करून आपल्या संशयित मित्रांना घटनास्थळी बोलावले. तिथे संशयित राज, एलरिच फर्नांडिस व इतर काहीजण आले. त्यांनी मल्लेश जोडी याला जबर मारहाण केली आणि त्याच्या मित्रांनाही गंभीर परिणामाची धमकी दिली. तसेच संशयितांनी आपल्या कारमधील दारूच्या बाटल्या या पोलिसांच्या गाडीत घालून त्याचा व्हिडिओ करून पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

नंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांना पाहून संशयितांनी कारसह धूम ठोकली. हळदोणा परिसरात सुमारे ८० किलोमीटर पर्यंत या संशयितांनी गाडी भरधाव वेगात चालवून पोलिसांची दमछाक करण्याचाही प्रयत्न केला होता. 

हेही वाचा