रेती वाहतुकीचे परमिट बनावट; दिनेश पालविरोधात गुन्हा दाखल

डिचोली पोलिसांची कारवाई : सिंधुदुर्गमधून गोव्यात करत होता रेती वाहतूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th April, 12:31 am
रेती वाहतुकीचे परमिट बनावट; दिनेश पालविरोधात गुन्हा दाखल

पणजी : बाहेरील राज्यांतून गोव्यात रेती आणण्यासाठी खाण खात्याकडून दिलेले जाणारे एक परमिट बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी दिनेश पाल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोव्याच्या नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन प्रकरणात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी सुरू आहेत. या संदर्भात न्यायालयाने पोलीस, खाण खाते तसेच इतर खात्यांना वेळोवेळी निर्देश जारी केले आहेत. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना निर्देश देऊन बेकायदेशीर रेती उपसा तसेच वाहतुकीवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.

दरम्यान, बाहेरून राज्यात रेती वाहतूक करण्यासाठी लागणारे एक परमिट बनावट असल्याची माहिती याचिकादारांनी मार्च महिन्यात न्यायालयात सादर केली होती. त्यात त्यांनी ३ आॅक्टोबर २०२३ रोजी डिचोली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नार्वे येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना रेती साठवून ठेवल्याचे नजरेस आले. पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित ठिकाणी बांधाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराला पाचारण करून चौकशी केली असता रेती कुडाळ (महाराष्ट्र) येथून वाहतूक केल्याचे सांगितले.

या संदर्भात कंत्राटदाराने वाहतूक परमिट सादर केले. त्यानुसार, २३ जून २०२३ रोजी रात्री १.०२ मिनिटांनी खाण खात्याकडून परमिट जारी करण्यात आल्याची माहिती त्यात होती. त्यात गोव्यात नोंदणी क्र. असलेल्या ट्रकांतून ६ हजार क्युबिक मीटर रेती कुडाळातून आणल्याची माहिती होती. याशिवाय त्यात चालकाचे नाव आणि त्याचा मोबाईल क्रमांक नोंद करण्यात आला होता.

या संदर्भात एका व्यक्तीने आरटीआयमार्फत खाण खात्याकडे अर्ज दाखल करून त्यांनी वरील परमिट जारी केले की नाही याची माहिती मागवली. खाण खात्याच्या सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञाने परमिट गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या भूमिजा यंत्रणेत नोंद नसल्याचे उत्तर दिले.

दरम्यान, संबंधित व्यक्तीने आरटीआय मार्फत मिळालेल्या दुसऱ्या माहितीत २३ जून २०२३ रोजी रात्री १.०२ मिनटांनी खाण खात्याकडून परमिट जारी केले आहे. मात्र त्यात महाराष्ट्र नोंदणी क्रमांक वाहन नमूद आहेत. याशिवाय त्यात चालक आणि त्याचा मोबाईल क्रमांक वेगळा असल्याची माहिती समोर आली आहे. याला खाण खात्याने दुजोरा दिला आहे. त्यामुळे एकाच वेळीच दोन परमिट समोर आल्यामुळे यात मोठे रॅकेट वावरत असल्याचे नाकारता येत नसल्याचा दावा करुन याचिकादारांनी कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली.

खाण खात्याच्या चौकशीत परमिट ‘बनावट’

खाण खात्याने चौकशी केली असता, संबंधित परमिट बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर खाण खात्याचे सहाय्यक जुओलोजिस्ट नितीन आतोस्कर यांनी डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, डिचोलीचे पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी दिनेश पाल याच्या विरोधात भादंसंच्या कलम ४२०, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.