कॉंग्रेसमधील मतभेद

काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून आता प्रचारालाही येत नाहीत. आपल्या स्वार्थामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते आपल्या उमेदवारांचाही मानसिक पराभव करत आहेत.

Story: संपादकीय |
10th April, 10:46 pm
कॉंग्रेसमधील मतभेद

काँग्रेसने गोव्यातील दोन्ही उमेदवार जाहीर केल्यानंतर इंडी आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा प्रचार करण्यासही सुरुवात केली. पण काँग्रेसमधीलच काही नेते मात्र या प्रचारापासून दूर राहत आहेत. काँग्रेसने ज्यांना आयुष्यभर वेगवेगळी पदे दिली ते नेते आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून काँग्रेसच्या प्रचारकार्यात भाग घेत नाहीत, असे चित्र गोव्यात आहे. दुसऱ्या बाजूने भाजपने ज्या इच्छुकांना डावलून दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपो यांना उमेदवारी दिली, ते इच्छुक भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत आहेत. निवडणुकीत असलेला तिसरा पक्ष रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी. या पक्षामध्ये उमेदवारी वाटपावरून वाद नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते एकत्र येऊन उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत आहेत. काँग्रेसमध्ये मात्र उमेदवारी वाटपावरून सुरू झालेला वाद उमेदवार जाहीर झाल्यानंतरही तीव्र आहे. उत्तरेत उमेदवारीसाठी इच्छुक होते विजय भिके. रमाकांत खलप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाने आपल्यावर अन्याय कसा केला ते सांगून खलप यांच्याविषयी आकसही भिके यांनी व्यक्त केला. 

दक्षिण गोव्यात तीच स्थिती. विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपल्याला उमेदवारी दिली नाही म्हणून आपल्याला दुःख झाल्याचे म्हटले. काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत जे इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून आता प्रचारालाही येत नाहीत. आपल्या स्वार्थामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते आपल्या उमेदवारांचाही मानसिक पराभव करत आहेत. त्यांच्यासोबत फिरण्यासाठी आधीच कार्यकर्त्यांची कमतरता आहे, अशा स्थितीत पक्षातील काही नेतेच प्रचाराकडे पाठ फिरवत आहेत. अॅड. रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद जास्त उफाळून आले. एका गटाला दक्षिण गोव्यात गिरीश चोडणकर किंवा सार्दिन यांना उमेदवारी मिळावी, असे वाटत होते. उत्तरेत काँग्रेसकडे खलप यांच्यासारखा दुसरा चांगला पर्याय नव्हता. पण युवा नेते सुनील कवठणकर यांना लोकसभेसाठी भवितव्य आजमावण्याची संधी मिळावी असे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनाही वाटले होते. विजय भिकेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. उमेदवारी खलप आणि विरियातो यांना जाहीर झाली. खलप यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने लगेच त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत म्हापसा बँकेचे तुणतुणे लावले. याचाच अर्थ खलप यांना वैयक्तिकरित्या बदनाम करण्यासाठीही भाजप कसर सोडणार नाही. कारण खलप यांच्याकडून भाजपला थोडा धोका आहे. हीच बाब काँग्रेसला कळली असती तर काँग्रेसने प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली असती. उत्तर गोव्यात काँग्रेसकडे फक्त एकच आमदार आहे. आप, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी, शिवसेना यांची मदत खलप यांना मिळेल, पण त्या मदतीचे मोल काय असेल हे निवडणुकीनंतर कळेल. श्रीपाद नाईक यांच्याविषयी सध्या काही प्रमाणात असंतोषाचे वातावरण असल्यामुळे गेल्या पाच निवडणुकांपेक्षा यावेळी त्यांना लोकांच्या रोषाला आणि प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्यामुळे भाजप आणखी चिंताग्रस्त आहे. 

आरजीपीचे मनोज परब यांना आपल्या पक्षाला २०२२ च्या निवडणुकीत मिळालेली मते शाबूत ठेवायची आहेत. शिवाय भाजप आणि काँग्रेसला कंटाळून लोक आरजीपीला पर्याय म्हणून पसंती देत असतील तर तेही आजमावयचे आहे. एकूणच तिन्ही उमेदवार प्रबळ आहेत. यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली असती जर काँग्रेसने आपली सगळी यंत्रणा कामाला लावली असती. सध्याच्या स्थितीत काँग्रेस प्रचारात मागे आहे. प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण झालेली नाही. भाजपने आपली दुसरी फेरी सुरू केली आहे. आरजीपीचे कार्यकर्ते दिवस रात्र लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यासाठी फिरत आहेत. प्रचारात कोणी मागे आहे तर ती काँग्रेस. उत्तर गोव्यात असेल किंवा दक्षिण गोव्यातही. दक्षिण गोव्यात काँग्रेससाठी एकच जमेची बाजू आहे ती म्हणजे, तिथे पाच आमदार सोबत आहेत. त्यातील मनापासून कॅप्टन विरियातोसाठी कोण काम करेल, याबाबत काही सांगता येणार नाही. आप आणि काँग्रेसचे आमदार आपल्यापरीने सर्व प्रयत्न करत आहेत. किमान तसे दिसत आहे. दक्षिणेत भाजपकडे असलेले सुमारे सोळा आमदार तसेच पक्ष संघटना यांच्या बळावर भाजपने प्राचारात बाजी मारली आहे. काँग्रेसला दोन्ही मतदारसंघांत कार्यकर्त्यांची कमतरता भासत असली तरीही निवडणूक तिरंगीच होईल हे नक्की.