सोनसडोतील साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगाला पुन्हा आग

तीन गाड्या पाण्याचा मारा; अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th April, 12:34 am
सोनसडोतील साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगाला पुन्हा आग

सोनसडो येथील साठवलेल्या कचऱ्याला लागलेली आग.

मडगाव : सोनसडो येथील प्रकल्पाच्या शेडमधील कचरा शेडच्या बाहेर काढण्यात आलेला आहे. मात्र, आगीच्या घटना थांबत नाहीत. रहिवासी इमारतींच्या बाजूला साठवणूक केलेल्या कचऱ्याला रात्री पुन्हा आग लागण्याची घटना घडली. तीन गाड्या पाण्याचा वापर करत साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर वेर्णा, मडगावातील अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
सोनसडो प्रकल्पातील कचऱ्याचा प्रश्न सध्या तरी सुटलेला दिसत असतानाच साठवणूक करून ठेवलेल्या कचऱ्याच्या ढिगाला रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागण्याची घटना घडली. सोनसडो येथील शेडनजीक असलेल्या सुरक्षा रक्षकांना आग दिसून येताच त्यांनी मडगाव अग्निशामक‍‍‍ दलाच्या कार्यालयाला माहिती दिली. मात्र, मडगाव अग्निशामक दलाची गाडी दुसऱ्या कॉलवर गेलेली असल्याने वेर्णा येथील अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. वेर्णाहून आलेल्या गाडीतील पाण्याचा मारा केल्यानंतरही आग विझलेली नव्हती. तोपर्यंत मडगाव अग्निशामक दलाची गाडी आली व त्यांनीही पाण्याचा मारा केला. मडगाव अग्निशामक दलाच्या दोन गाड्या पाण्याचा मारा केल्यानंतर आग नियंत्रणात आली. ही आग धुमसत राहून पुन्हा पेटत असल्याने सुमारे साडेतीन तास अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
दरम्यान, न्यायालयातील सुनावणीवेळी अग्निशामकची यंत्रणा सोनसडो येथे बसवण्याच्या सूचना न्यायालयाकडून करण्यात आलेल्या आहेत. शेडमधील कचरा सुकण्यासाठी व सिमेंट कंपन्यांना पाठवण्यासाठी प्रकल्पाच्या परिसरात साठवून ठेवलेला आहे. सदर आग वेळीच आटोक्यात आल्याने ती परिसरात पसरली नाही.

हेही वाचा