हरवळेतील मंदिर भंडारी समाजाचेच!

यापुढे गप्प बसणार नाही : सचिव सुभाष किनळकर यांचा इशारा

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
09th April, 12:12 am
हरवळेतील मंदिर भंडारी समाजाचेच!

पत्रकार परिषदेत बोलताना यशवंत माडकर. सोबत सुभाष किनळकर, संघेश कुंडईकर. इतर समिती व समाजाचे प्रतिनिधी.

साखळी : हरवळेतील श्री रुद्रेश्वर मंदिर हे भंडारी समाजाचेच आहे. या मंदिरातील सर्व सण-उत्सवात केवळ भंडारी समाजालाच अधिकार आहे. या देवस्थानच्या घटनेप्रमाणेच हे सर्व चालत असतानात वरचे हरवळेतील सातेरकर गटाकडून बेकायदेशीरपणे या मंदिरातील सणांमध्ये आपला हक्क दाखविण्याचा प्रयत्न करून गोंधळ माजविला जात आहे, असा आरोप रुद्रेश्वर देवस्थानचे सचिव सुभाष किनळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
रविवारी रात्री मासिक पालखीवेळी उडालेल्या गोंधळानंतर रात्री उशिरा देवस्थान समितीतर्फे कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, उपाध्यक्ष दीपक नाईक, मुखत्यार संघेश कुंडईकर आदी उपस्थित होते.
मासिक पालखीला ५ वाजल्यापासून पालखी बाहेर काढेपर्यंत कोणताही विषय नव्हता. पण, ८ वा. पालखी बाहेर काढल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्रेश्वर मंदिरात गोंधळ घातलेल्या लोकांकडून पुन्हा गोंधळ घालत बेकायदेशीरपणे पालखी खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला. वास्तविक या गोंधळ घालणाऱ्या लोकांवर देवस्थान समितीतर्फे दोन वेळा तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना या ठिकाणी येण्यापासून पोलिसांनी रोखण्याची आवश्यकता होती. परंतु, प्रशासनाने या लोकांना मोकळीक दिल्यानेच हा गोंधळाचा प्रकार घडला, अशी टीकाही किनळकर यांनी केली.
घटनेप्रमाणे या मंदिराच्या सर्व उत्सवांवर भंडारी समाजाचा अधिकार आहे. तरीही काही लोक पुन्हा पुन्हा हेतुपुरस्सर या मंदिराच्या उत्सवांमध्ये आपला शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. आज भंडारी समाजाला हाताच्या बोटावर मोजणाऱ्या गोंधळ घालणाऱ्या लोकांनी आव्हान दिले आहे. भंडारी समाज जागरूक होऊन एकत्रित आल्यास भविष्यात या समाजाचे अस्तित्व कठीण आहे.
यापुढे घटनेप्रमाणेच या मंदिराचे सर्व कार्य चालणार. या मंदिराला केवळ वरचे हरवळेतील केळबाईकर व जोगसकर हेच संलग्नित आहेत. इतर कोणीही लागत नाही. त्यामुळे यापुढे अकारण या मंदिरात आपल्याला नसलेला हक्क मिळविण्यासाठी दमदाटी करू नये. आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही चालणार आहे.

श्री रुद्रेश्वर देवस्थानात गोंधळ घालणाऱ्या लोकांविरोधात पोलीस तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पोलीस व प्रशासनावर कोणाचा दबाव आहे? हे मंदिर भंडारी समाजाचेच आहे. घटनेप्रमाणेच सर्व सण व प्रथा चालणार, यात कोणताही बदल होणार नाही. _यशवंत माडकर, स्थानिक

हेही वाचा