रुद्रेश्वर देवस्थान समितीकडून भंडारी समाजाचा गैरफायदा!

सातेरकर गटाकडून खुलासा : हरवळे गाव मळीक कुटुंबीयांचा

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
09th April, 12:10 am
रुद्रेश्वर देवस्थान समितीकडून भंडारी समाजाचा गैरफायदा!

पत्रकार परिषदेत बोलताना गितेश मळीक. सोबत दशरथ मळीक व वरचे हरवळेतील सातेरी देवस्थानचे गावकरी.

साखळी : हरवळे हा गाव एक असून आम्ही गावकर एकत्रित आहे. रुद्रेश्वर मंदिरात आम्हाला मान आहे. तो कोणीही काढून घेऊ शकत नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी रुद्रेश्वराच्या आशीर्वादाने स्वबळावर लढत आहोत. आम्हाला कोणाचाही राजकीय पाठिंबा नाही, असा खुलासा वरचे हरवळे येथील श्री सातेरकर गटाने पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
या पत्रकार परिषदेला गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सातेरी देवस्थान अध्यक्ष गितेश मळीक यांनी सांगितले की, हरवळेत होणाऱ्या पालखी सोहळ्याला दरवेळी आमच्या गावातील दहा-पंधरा लोक जातात. परंतु, यावेळी भंडारी समाजातील लोकांनी या पालखीला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केल्याने आमच्या लोकांमध्ये घबराट झाली. काही कारणास्तव हल्ला झाला तर काय करणार, या भीतीने आमच्या गावातील लोक मोठ्या संख्येने पालखीला गेले. त्यांना आम्ही देवस्थानतर्फे आवाहन केले नव्हते.
पालखी मिरवणुकीदरम्यान रविवारी आमचे लोक पालखी मागे चालताना समितीच्याच लोकांमध्ये काहीतरी धूसफूस झाली. मात्र, समितीने त्याचे खापर आमच्यावर फोडले, हे चुकीचे आहे. हे प्रकरण आमचे व आमच्या गावचे आहे. हरवळे गाव हा मळीक कुटुंबीयांचा आहे. त्यामुळे आमच्या हक्कासाठी आम्ही लढणारच. यासाठी आम्ही कायदेशीर लढा देण्यासही तयार आहोत. परंतु, या विषयात मुख्यमंत्र्यांचे नाव गोवणे निरर्थक आहे. रविवारच्या पालखी सोहळ्यात रुद्रेश्वर मंदिरात भंडारी समाजातील उपस्थित राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहिल्यास कोणाला कोणाची फूस आहे ते लक्षात येते, असेही मळीक म्हणाले.
सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय घडामोडी तेजीत आहेत. याच राजकारणात आपला स्वार्थ साधण्यासाठी रुद्रेश्वर देवस्थान समिती राज्यभरातील भंडारी समाजातील लोकांचा गैरवापर करीत आहे. भंडारी समाजातील लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे. आम्ही हिंदू असून देवस्थान व इतर कारणांसाठी एकमेकांशी भिडणे योग्य नाही. यासाठी सुज्ञ लोकांनी या समितीचा हेतू लक्षात घ्यावा, अशी मागणी गितेश मळीक यांनी केली.
हरवळेतील रुद्रेश्वर मंदिरात मंत्री रवी नाईक, आमदार वीरेश बोरकर, आपचे अमित पालेकर, सुनील कवठणकर व इतर नेत्यांना का उपस्थित रहावे लागले, याचा प्रथम विचार करायला हवा. यापूर्वी अशी पाळी कधीही आली नव्हती. याला सर्वस्वी देवस्थान समिती जबाबदार आहे, असे दशरथ मळीक म्हणाले.
देवस्थान समितीचा मनमानी कारभार
हरवळेतील सर्व उत्सव व सण यापूर्वी कोणत्याही वाद व तंट्याशिवाय चालत होते. आताच या सणांमध्ये वाद का होऊ लागले, यावर विचार करण्याची गरज आहे. याचे मुख्य कारण देवस्थान समिती आहे. या समितीचे पदाधिकारी आपली मनमानी करीत असल्याने हे विषय उद्भवू लागले आहेत. या समितीला आजपर्यंत चालत आलेली परंपरा, सलोखा राखता आला नाही. यासाठी ही स्वीकृत समिती उपजिल्हाधिकाऱ्याने बरखास्त करून त्यावर ज्येष्ठ भंडारी समाजातील व्यक्तींची नेमणूक करावी, अशी मागणी दशरथ मळीक यांनी केली.       

हेही वाचा