तपासणीनंतर ‘ईव्हीएम’ मतदारसंघनिहाय स्ट्राँगरूममध्ये

दक्षिण गोव्यातील मशिन्सची केंद्रांनिहाय विभागणी, पडताळणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th April, 12:22 am
तपासणीनंतर ‘ईव्हीएम’ मतदारसंघनिहाय स्ट्राँगरूममध्ये

निवडणुकीसाठी ईव्हीएम व इतर साहित्य स्ट्राँगरुममध्ये नेण्यात येत असताना कर्मचारी. (संतोष मिरजकर)

मडगाव : राज्यात निवडणूक आयोगाकडून मतदार जागृतीपर कार्यक्रम करतानाच निवडणूक केंद्रांवरील ईव्हीएम व इतर साहित्य पाठवण्याची तयारीलाही वेग देण्यात आला आहे. दक्षिण गोव्यातील विविध केंद्रानिहाय व मतदारसंघानिहाय ईव्हीएम मशिन तपासणीअंती विलगीकरण करुन ते साहित्य दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेली आहेत.
दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकांसाठीची तयारीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांसाठीची सर्व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिट ही मशिनरी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीतील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेली होती. लोकसभा निवडणुका ७ मे रोजी होणार असून त्यासाठी दक्षिण गोव्यातील २० मतदारसंघानिहाय मशिन्सची विभागणी करणे, त्या मशिन्सची पडताळणी करण्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली. दक्षिण गोव्यातील सर्व मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीकडे शुक्रवारी बोलावले होते. मतदारसंघनिहाय, मतदार केंद्रनिहाय प्रत्येक ईव्हीएम मशिन्सची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मतदान केंद्रावर लागणारे पेन, पेन्सिल, पट्टी व इतर स्टेशनरी साहित्यही मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
दक्षिण गोव्यातील २० मतदारसंघानुसार मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम व इतर साहित्याची विभागणी करण्यात आली. त्या मशिन्सची पडताळणी करण्यात आल्यानंतर ते साहित्य मतदारसंघानुसार टेम्पोंमध्ये भरण्यात आले. पोलीस बंदोबस्तात हे सर्व निवडणूक साहित्य दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माथानी साल्ढाणा कॉम्प्लेक्समधील स्ट्राँगरूममध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी मतदारसंघनिहाय वेगवेगळे भाग करण्यात आलेले असून ईव्हीएम मशिन्स व इतर साहित्य विभागून ठेवण्यात येणार आहे. याशिवाय १७ एप्रिल रोजी पुन्हा या साहित्याची चाचपणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुकीसाठी नेमणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व कडक पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.

हेही वाचा