पॅप स्मीअर चाचणी का करावी ?

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग शोधण्यासाठी पॅप स्मीअर चाचणी किंवा पीएटी चाचणी केली जाते. ती का केली जाते आणि कोणत्या वयोगटातील महिलांनी ती करून घ्यावी?

Story: आरोग्य |
05th April, 10:00 pm
पॅप स्मीअर चाचणी का करावी ?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग महिलांमध्ये खूप सामान्य आहे. दरवर्षी १,३२,००० नवीन रुग्ण या आजाराने पिडित होतात आणि ७४,००० स्त्रिया मृत्युमुखी पडतात. गर्भाशयाच्या मुखाच्या आजाराची लक्षणे लवकर दिसत नाहीत व निदान होईपर्यंत उशीर झालेला असतो. जगभरात याबद्दल जाकरूकता वाढली असली तरी अजूनही महिलांवर्गात या कर्करोगाबद्दल काही न्यूनगंड, काही अपुरी माहिती आहे. हा कर्करोग गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो आणि हळूहळू सामान्य पेशी कॅन्सर पेशींमध्ये बदलतात व बहुतेक वेळेस ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) च्या संसर्गामुळे होतात. याबद्दल शोधून वेळीच उपचार केल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येऊ शकतो. अशा वेळी महत्त्वाची ठरते पॅप स्मीअर चाचणी. 

पॅप स्मीअर ही निरोगी महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखामधील पूर्व कर्करोगाबद्दलची तपासणी करण्यासाठी प्रतिबंधात्मक चाचण्यांपैकी एक आहे. पॅप स्मीअर चाचणीचा उद्देश गर्भाशयाच्या पेशींमध्ये कोणतेही असामान्य असलेले बदल शोधणे हा असतो. गर्भाशयाच्या मुखामध्ये कर्करोगाची उपस्थिती किंवा भविष्यात ते होण्याची शक्यता याबाबत माहिती या चाचणीद्वारे मिळते. लैंगिक जीवनात सक्रिय असलेल्या महिलांसाठी ही चाचणी महत्त्वाची असते, ज्याच्या मदतीने गर्भाशयाच्या पेशींची तपासणी केली जाऊ शकते. तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे सोपेपणी दिसून येत नसल्याने, महिलांनी नियमित अंतराने पॅप स्मीअर चाचणी करत राहणे गरजेचे असते.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग शोधण्यासाठी या चाचणीत, गर्भाशयाच्या पेशींमधून नमुना घेतला जातो. या चाचणीतून काही प्रकारचे विषाणूजन्य संसर्ग शोधले जातात. यामध्ये एचपीव्हीचाही समावेश असतो, ज्याला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण मानले जाते. या चाचणीद्वारे तपासणी करून, कर्करोग विकसित होण्या आधीच नष्ट केला जाऊ शकतो. ही चाचणी अतिशय सोपी, कमी वेळ घेणारी आणि सहसा वेदनारहित स्क्रीनिंग चाचणी आहे. कोणत्याही चाचणीमध्ये काही प्रमाणात त्रुटी असतातच, त्यामुळे अनेक वेळा नियमित चाचण्या करूनही गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

आपण पॅप स्मीअर चाचणी पहिल्यांदाच करून घेत असल्यास मनात थोडी भीती येऊच शकते. पण चाचणी दरम्यान शांत, आरामशीर रहाणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवा. चाचणीआधी मूत्राशय पूर्णपणे रिकामे ठेवावे. मासिक पाळी चालू असताना पॅप चाचणी करून घेऊ नये, कारण अशा वेळेस चुकीचे निकाल मिळण्याची शक्यता असते. चाचणीसाठी जाण्याच्या एक दिवस आधी लैंगिक संबंध ठेवू नये व कोणत्याही शुक्राणूनाशकांचा वापर टाळावा. तसेच योनिमार्गात टॅम्पून्सचा वापर व योनीतून डचींग करणे टाळावे. याचा परिणाम पॅप स्मीअर चाचणीच्या निकालावर होऊ शकतो. गर्भधारणेदरम्यान पहिल्या २४ आठवड्यात ही चाचणी करणे सुरक्षित असते. त्यानंतर ही चाचणी करून घेणे वेदनादायक असू शकते. तसेच प्रसुतीनंतर १२ आठवड्यांनंतर चाचणी करणे योग्य असते कारण तोपर्यंत गर्भाशय पूर्वस्थितीत आलेले असते. 

चाचणी कशी करतात

पॅप स्मीअर चाचणी अगदी काही मिनिटांत पूर्ण होते. यासाठी गुडघे वाकवून पाठीवर झोपवले जाते व डॉक्टर स्पेक्युलम नावाच्या उपकरणाद्वारे योनीतून गर्भाशयाची तपासणी करतात. स्पेक्युलमद्वारे तपासणीदरम्यान पेल्विक भागात थोडी वेदना किंवा दाब जाणवू शकतो. यानंतर, स्पॅटुलाच्या मदतीने गर्भाशयातून पेशी गोळा केल्या जातात. मग त्या पेशींचे नमुने असामान्य किंवा कर्करोगाच्या पेशींच्या उपस्थितीची चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात.

वयाच्या २१ व्या वर्षांनंतर महिला नियमितपणे पॅप स्मीअर चाचणी करू शकतात. ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला, ज्यांचे याआधीचे पॅप स्मीअर चाचणीचे निकाल सामान्य आले असतील, त्या महिला ही चाचणी करणे थांबवू शकतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग करणारा एचपीव्ही विषाणू अनेक वर्षे निष्क्रिय राहिल्यानंतरही पुन्हा सक्रिय होऊ शकतो. यामुळे नियमित लैंगिक संबंधात नसले तरीही, पॅप स्मीअर चाचणी मात्र नियमितपणे करून घेतली पाहिजे. 

एचपीव्ही लसीकरण करूनही नियमित पॅप स्मीअर करण्याची गरज असते कारण जरी एचपीव्ही लस आंशिक संरक्षण देते तरी सगळ्या तऱ्हेच्या एचपीव्ही विषाणूंपासून संपूर्ण संरक्षण देत नाही.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर