चार्जिंगला लावलेल्या वाहनाच्या बॅटरीचा स्फोट; एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू!

महाराष्ट्राच्या संभाजीनगरमधील भयंकर दुर्घटना; बॅटरी चार्जिंगला लावून झोपणे बेतले जीवावर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 10:29 am
चार्जिंगला लावलेल्या वाहनाच्या बॅटरीचा स्फोट; एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू!

संभाजीनगर : वीज, आग आणि पाणी यांच्याजवळ माणसाने कधीही बेसावध राहू नये. याचा प्रत्यय महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे घडलेल्या भयंकर दुर्घटनेमुळे आला आहे. इलेक्ट्रिक अॅक्टिवा बॅटरी घराच्या बाजूलाच कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावून झोपणे एका कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे. या बॅटरीचा जबरदस्त स्फोट झाल्याने या कुटुंबातील अल्पवयीन मुले आणि वृद्ध मिळून ७ जणांच होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वस्तू वापरताना सावधगिरी बाळगा.

लहान मुले, वृद्ध आणि महिला असे संपूर्ण कुटुंब झोपेत होते, अचानक मोठा स्फोट झाला आणि घरात आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत कुटुंबातील ७ लोक अक्षरशः होरपळून मेले. ते जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होते, पण आत कोणीही मदतीला जाऊ शकले नाही. मृतांमध्ये अल्पवयीन असीम वसीम शेख व परी वसीम शेख यांच्यासह वसीम शेख (३०), तनवीर वसीम (२३), हमीदा बेगम (५०), शेख सोहेल (३५), रेश्मा शेख (२२) यांचा समावेश आहे. या घटनेत २ जण पूर्णपणे भाजले. तर, ५ जणांचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सातही मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत. आग विझवल्यानंतर घराच्या आतील दृश्य पाहून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही धक्का बसला.

महाराष्ट्रात आज पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान वरील आगीची भीषण घटना घडली. संभाजीनगरमध्ये एक इमारत आहे. त्या इमारतीच्या तळमजल्यावर कपड्यांचे आणि टेलरचे दुकान आहे. या दुकानात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला लावण्यात आले होते. याच वाहनाच्या बॅटरीचा स्फोट झाला. या खोलीत मोठ्या प्रमाणात कपडे होते. त्यांनी लगेच पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी वरच्या मजल्यांनाही वेढले.

स्फोटाचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इकडे इमारतीत राहणाऱ्या कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केला. लोकांनी अग्निशामक दलालाही फोन केला आणि पोलिसांना बोलावले. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग विझवली. मात्र, तोपर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच सर्व सामान जळून राख झाले होते. पोलिसांनी जळालेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले.

औरंगाबाद पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. दुकानात एक इलेक्ट्रिक ॲक्टिव्हा चार्ज होत असताना जास्त चार्जिंगमुळे स्फोट झाला. घटनास्थळावरून ती स्कूटरही जप्त करण्यात आली आहे. दोन कुटुंबे वरच्या दोन मजल्यावर राहत होती. ज्यांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण इमारत जळून राख झाली आहे.