काणकोणातील शिशारान्नीची परंपरा

गावडोंगरी, अवे आणि श्रीस्थळ या तीन ठिकाणच्या मल्लिकार्जुन देवस्थानांत शिमगोत्सवात दर दोन वर्षांनी शिशारान्नीची परंपरा असून त्या लोकोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. एकावर्षी युद्ध आणि शौर्याची गतकालीन परंपरेची संवर्धन करणारी वीरामेळ नृत्याची परंपरा तर दुसऱ्या वर्षी शिशारान्नीचा उत्सव या तिन्ही मल्लिकार्जुन मंदिरांच्या प्रांगणात संपन्न होतो.

Story: विचारचक्र |
03rd April, 12:55 am
काणकोणातील शिशारान्नीची परंपरा

गोव्याच्या एका टोकाला वसलेल्या काणकोण तालुक्यात शिमगोत्सवाच्या कालखंडात नाना विधी, नाना परंपरा यांचे दर्शन घडत असते. या लोकपरंपरेचा वेध घेतला असता त्यामागचा इतिहास, संस्कृतीच्या विविधांगी पैलूंचे दर्शन झाल्याशिवाय राहात नाही. पेडणे ते काणकोणपर्यंत शिमग्याच्या कालखंडात बऱ्याच गावांनी ज्या सण, उत्सवांची परंपरा निर्माण केली आहे, त्यामागे भाविकांना परमेश्वराच्या दिव्यत्वाची प्रचिती देऊन त्यांची श्रद्धा दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जातात. दरवर्षी किंवा दोन वर्षांनी ज्या उत्सवाचे प्रयोजन केलेले असते, त्याला भाविकांची लाभलेली उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे एकदा लाभलेली लोकांची गर्दी अशा उत्सवांना कायम लाभते. मानवी डोक्यांचा वापर चुलीसारखा करून त्यात निर्माण केलेल्या आगीवर अन्न शिजवण्याचा प्रातिनिधिक विधी काणकोणात प्रचलित असलेल्या शिशारान्नी उत्सवाचे मुख्य आकर्षण असून तो अनुभव याची देही याची डोळा घेण्यासाठी भाविकांबरोबर लोकांचीही गर्दी होत असते. 

शिमग्याच्या काळात आपल्या गावात संपन्न होणाऱ्या जत्रोत्सवात लक्षवेधक, मर्मभेदक आणि तनामनाला गुंतवून ठेवणाऱ्या बाबी नसतील तर लोकांचे आकर्षण टिकवून ठेवणे कठीण होईल आणि म्हणून कुठे गड्याच्या जत्रेला भूताखेतांच्या वलयाबरोबर देवचाराच्या मशालीची पार्श्वभूमी लाभली, तर कुठे छत्र्यांची उत्साहपूर्वक मिरवणूक, कुठे जमिनीत गाडून घेणारा चोरोत्सव अशा विविध उत्सवांचे प्रयोजन करण्यात आले. परमेश्वराचे अस्तित्व मानवी मनाला शेकडो वर्षांपासून मोहिनी घालत असून त्याच्या दिव्यत्वाची प्रचिती आली, तसे भाविक पुन्हा पुन्हा श्रीस्थळी येतील याची जाणीव लोकमनात होती आणि त्यासाठी त्यांनी सण उत्सवांच्या परंपरेमागे असंख्य चमत्कारांचे लोकविलक्षण वलय निर्माण केले. त्यासाठी अशा जत्रा, उत्सवांना होणारी गर्दी दरवर्षी वाढतच जाते.

काणकोण तालुक्यात मल्लिकार्जुन देवाचे पूर्वापार मोठे प्रस्थ असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशातल्या नंदीकोट येथील श्रीशैलम पर्वतावरच्या मल्लिकार्जुनाशी त्याचे अनुबंध असल्याचे मानले जाते. तेथूनच काणकोण आणि गोव्यातल्या अन्य प्रांतांत मल्लिकार्जुन उपासनेची परंपरा रूढ झाली, असे मानले जाते. या तालुक्यात गावडोंगरी, अवे, श्रीस्थळ आणि कुस्के अशा चार ठिकाणी मल्लिकार्जुनाची मंदिरे असून त्यातल्या सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेल्या गावडोंगरीच्या मल्लिकार्जुन देवालयाला पोर्तुगीज पूर्व शेकडो वर्षांच्या इतिहासाची पार्श्वभूमी लाभली असल्याचे मानले जाते. गावडोंगरी, अवे आणि श्रीस्थळ या तीन ठिकाणच्या मल्लिकार्जुन देवस्थानांत शिमगोत्सवात दर दोन वर्षांनी शिशारान्नीची परंपरा असून त्या लोकोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. एकावर्षी युद्ध आणि शौर्याची गतकालीन परंपरेची संवर्धन करणारी वीरामेळ नृत्याची परंपरा तर दुसऱ्या वर्षी शिशारान्नीचा उत्सव या तिन्ही मल्लिकार्जुन मंदिरांच्या प्रांगणात संपन्न होतो.

शिशारान्नीच्या विधीत सहभागी होणारे गडे आणि भगत शुचिर्भूत झाल्यानंतर मंदिरात येतात आणि देवस्थानाशी संबंधित दहा वांगडी आणि महाजनांच्या उपस्थितीत शिशारान्नी निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी मल्लिकार्जुनास गाऱ्हाणे घालतात. त्यानंतर तीन पारंपरिक वेशभूषेतले गडे एकमेकांची डोकी चुलीच्या स्थितीत राहतील अशा तऱ्हेने जमिनीवर झोपतात आणि अशा मानवी डोक्यांच्या चुलीवर मातीचे मडके ठेवून खाली शिसवीच्या लाकडाद्वारे आग पेटवली जाते. लोकवाद्यांद्वारे निर्माण केलेल्या पोषक पार्श्वसंगीतावर उभे असलेले तीन भगत नंग्या तलवारीचे वार केल्याचे वातावरण निर्माण करतात. त्यापैकी एक भगत वीरासन घालून बसल्यावर दुसरा भगत त्याच्या मस्तकी दंडुक्याद्वारे प्रहार करून तलवारीच्या वाराद्वारे रक्त काढतो. हे रक्त शिजत असलेल्या भातात कालवून आजूबाजूस शिंपडले जाते. शिशारान्नीच्या प्रसंगी आधाराविना उभी असलेली देवांची तरंगे आणि लोकवाद्यांचे संगीत उपस्थितीत भाविकांत दैवी शक्ती विषयीची भावना जागृत करून नतमस्तक होण्यास प्रवृत्त करतात. 

शिशारान्नीच्या विधीनंतर भाविकांना कौलप्रसाद दिला जातो. शिशारान्नी ज्यावर्षी असेल त्यावर्षी भूतबाधा झालेल्या व्यक्तींवर रक्ताने माखलेला शिजवलेला भात पडताच भुते पळून जातात, अशी लोकधारणा आहे आणि त्यासाठी इथे भाविकांची मोठी गर्दी असते. शिशारान्नीचा विधी गोव्यात फक्त काणकोणात संपन्न होतो, तो शिमगोत्सवाच्या कालखंडात. मानवी डोकी चुलीसाठी वापरून त्यात शिसवी लाकडाद्वारे अग्नी निर्माण करून मातीच्या भांड्यात भात शिजवून त्यात एका भगतावरती तलवारीचा किंचित वार करून आलेले रक्त कालवण्यासाठी वापरले जाते आणि रक्तमिश्रित भात चहुबाजूला शिंपडला जातो. शिसवी लाकडांमुळे चुलीतला अग्नी प्रदिप्त होतो म्हणून तिला शिशारान्नी म्हटले जाते, असा काही लोकसंस्कृती अभ्यासकांचा कयास आहे, तर काहींच्या मते मानवी शीर्ष म्हणजे डोक्यांचा वापर चूल म्हणून अन्न शिजवण्यास केला जात असल्याने त्यातूनच शिशारान्नी शब्दांची निर्मिती झाली, असे मानले जाते.

शिमग्याच्या कालखंडात गोवा, कोकणातल्या बऱ्याच गावोगावी जे विधी-उत्सव साजरे केले जातात त्यामागे कोणती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, हे निश्चित सांगणे कठीण असले तरी कधीकाळी आपल्या पूर्वजांच्या हातून वेगवेगळ्या कारणांसाठी जेव्हा मनुष्य हत्या झाली, तेव्हा भूतबाधा टाळण्यासाठी अतृप्त आत्म्यामार्फत त्रास होऊ नये म्हणून जे विधी परंपरेतून करण्यात आले, त्याद्वारे शिशारान्नीसारख्या विधी उत्सवाचा उगम झाला असावा.

इतिहासकार डॉ. स. शं. देसाई यांच्या मते, गोवा कदंबच्या राजवटीत म्हैसूर परिसरातून आलेल्या हब्यू ब्राह्मण शेतकऱ्यांचे काणकोणात वास्तव्य होते. त्यांचा निःपात षडयंत्राद्वारे करण्यात आला तो मृत्युपान्नात. भाद्रपद शुद्ध पंचमीला दरवर्षी बाराजण सभेपान्नात विशिष्ट विधी केला जातो. डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी काणकोणच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभ्यास केलेला असून त्यांच्या मते कधी काळी झालेल्या मानव संहाराचे प्रायश्चित्त म्हणून शिशारान्नीच्या विधीची परंपरा काणकोणात निर्माण झाली असावी. एका वर्षी वीरामेळ तर दुसऱ्यावर्षी शिशारान्नी साजरी करण्याची गावडोंगरी, श्रीस्थळ आणि अवे येथे परंपरा आहे. ज्यावर्षी श्रीस्थळात शिशारान्नी असते त्यानंतर गुढीपाडव्यादिवशी शिशारान्नीचे प्रतिकात्मक सादरीकरण वैजावाडा येथे होते. दिव्या जत्रेच्या उत्सवाचा समारोप करताना इथल्या वेळीप-गावकर समाजामार्फत शिशारान्नी साजरी केली जाते. अशा विधी, परंपरा यांचा सखोलपणे वेध घेतला तर त्यामागच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीची कल्पना येणे शक्य आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५