जीवाचा गोवा

अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सरकारने वॉटर स्पोर्ट्सवर नियंत्रण ठेवून त्यांच्यात सुसूत्रता आणण्याची गरज आहे. एक दुर्घटना गोव्याच्या पर्यटनाला घातक ठरू शकते. गोव्यात सुरक्षित पर्यटन आहे, याचा संदेश सर्वत्र जाण्यासाठी सरकारने किनाऱ्यांवरील जलक्रीडांना नियंत्रित करावे लागेल.

Story: संपादकीय |
27th December 2024, 10:09 pm
जीवाचा गोवा

कोविडपूर्वी गोव्यात जशी देशी, विदेशी पर्यटकांची जत्रा भरायची तशीच जत्रा आता हळूहळू पुन्हा गोव्यात भरू लागली आहे. कोविडच्या काळात जगभरातील सर्वच पर्यटन स्थळे ओस पडली होती. सगळ्याच ठिकाणी पर्यटकांचा दुष्काळ होता. कोविड गेल्यानंतर स्थिती पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. २०१८ मध्ये ८०.१५ लाख तर २०१९ मध्ये ८०.६५ लाख पर्यटक गोव्यात आल्याची नोंद आहे. ज्यात प्रत्येकी ९.३३ आणि ९.३७ लाख विदेशी पर्यटक होते. कोविडच्या महामारीने साऱ्या जगालाच नुकसान केले. त्यानंतर काही देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे तिथल्या पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम झाला. म्हणजेच कोविडच्या पूर्वी जी संख्या होती ती संख्या पूर्ववत होण्यासाठी बराच कालावधी लागेल. असे असले तरी सध्या जी पर्यटकांची संख्या वाढत आहे ती सकारात्मक आहे. 

गोव्याची अर्धी अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायामुळेच उभी आहे. हॉटेल्स, शॅक्स, इतर रेस्टॉरंट्स, दुकाने, वॉटर स्पोर्ट्स, पब - नाईट क्लब, स्पा, कॅसिनो, पेट्रोलपंप, वाईन स्टोअर्स, टॅक्सी, रेंट अ कॅब, विमानतळ अशी मोठी व्यवसायाची साखळी पर्यटनाच्या हमीवरच गोव्यात सुरू आहे. देशी आणि विदेशी असे दोन्ही पर्यटक गोव्यातील पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक आहेत. त्यांच्या स्वागतासाठी गोवा नेहमीच तयार राहतो. पण अनेकदा पर्यटकांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे गोव्याची बदनामीही झाली आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात गोव्यातील कुठलेच वाईट प्रकार लपून राहिलेले नाहीत. यूट्युब, इन्स्टा, फेसबुक, ट्विटरच्या (एक्स) माध्यमातून गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील गैरप्रकार नेहमीच जगासमोर येत आहेत. त्यामुळे गोव्याने आता अधिक सावध राहणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटन क्षेत्राला गालबोट लागू नये, याची खबरदारी घ्यावी लागेल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच गोव्यातील पर्यटन क्षेत्रात बोट बुडण्यासारख्या अनेक घटना घडत राहिल्या. प्रशासनाने चांगली व्यवस्था केली, पर्यटन खात्याने आपले काम दक्षतेने केले तर बऱ्याच गोष्टी नियंत्रणात येतील. 

बुधवारी कळंगूट समुद्रात जी बोट बुडली होती, त्यातून दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. अन्यथा या प्रकारामुळे गोव्यातील पर्यटन व्यवस्थापनावर जगभरातून प्रश्न निर्माण केले असते. बोटीची मर्यादा १४ प्रवाशांची असताना त्यात २० जण बसले होते. हा जीवाशी खेळ करण्यासाठी बोट मालकच पर्यटकांवर दबाव आणतात. दोन बोटींमधून या पर्यटकांना जाता आले असते. पर्यटकांनीही एकाच बोटीतून जाण्याचा आग्रह धरला असावा. बोट बुडाल्यानंतर इतर बोट चालकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे दुर्घटना टळली अन्यथा या घटनेमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला गालबोट लागले असते. तरीही या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बोट चालकांना हा अपघात टाळता आला असता, त्यांनी आपल्या स्वार्थासाठी इतरांचा जीव धोक्यात टाकला. त्यांच्यावर हलगर्जीपणा नव्हे तर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हायला हवा. यापूर्वी वागातोर येथे ऑक्टोबर महिन्यात बोट उलटली होती, त्यातील २० जणांना वाचवण्यात आले होते. जानेवारी २०२३ मध्ये वास्को येथे बोट उलटली होती, त्यातील ५० जणांना वाचवले होते. या सगळ्या बोटींची आसन व्यवस्था पाहिली तर क्षमतेपेक्षा जास्त लोक त्यात बसले होते, असे दिसून येते. अशा घटना अनेकदा होत असतात, पण त्या उजेडात येत नाहीत. यावरून या बोटींवर कोणाचे नियंत्रण नाही हे लक्षात येते. वॉटर स्पोर्ट् सच्या  नावाखाली पर्यटकांची लूट सुरू आहेच, पण ती कोणाच्या आशीर्वादाने असा प्रश्न उपस्थित होतो. पर्यटन खाते, नदी परिवहन, कॅप्टन ऑफ पोर्ट् स अशा खात्यांनी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फक्त लक्ष देणे नव्हे तर हे व्यवसाय नियंत्रित व्हायला हवेत. सरकारच्या देखरेखीखाली हे व्यवसाय असणे तसेच ते नियमांप्रमाणेच चालतील यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पर्यटक बोट बुडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. इतरांनी मदतीसाठी वेळीच धाव घेतल्यामुळे दुर्घटना टळल्या आहेत. अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सरकारने वॉटर स्पोर्ट् सवर नियंत्रण ठेवून त्यांच्यात सुसूत्रता आणण्याची गरज आहे. एक दुर्घटना गोव्याच्या पर्यटनाला घातक ठरू शकते. गोव्यात सुरक्षित पर्यटन आहे, याचा संदेश सर्वत्र जाण्यासाठी सरकारने किनाऱ्यांवरील जलक्रीडांना नियंत्रित करावे लागेल.