नवीन विचार रुजवून त्याची जोपासना करूया !

आपले विषय अन् सादरीकरण राजकीय, धर्मांध अजेंडा पुढे नेणारे नसून, आपण सगळी प्रभूची लेकरे आहोत व समस्ताला बंधू मानून आपण सगळ्यांवर प्रेम केले पाहिजे, हा संस्कार रुजवणारे हवेत.

Story: विचारचक्र |
27th December 2024, 10:06 pm
नवीन विचार रुजवून त्याची जोपासना करूया !

‘ब’गट नाट्य स्पर्धेत सादर झालेले ‘देवा म्हाराजा’ हे नाटक पाहण्याचा योग आला. एक वेगळे नाटक आणि वेगळे दिग्दर्शन बघून समाधान वाटले आणि अस्वस्थता जाणवली. आपल्या अवतीभवती असलेली सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली बघून निराशा येत असते. तरीही ती परिस्थिती नाकारत, आपण चांगले काय आहे ते धुंडाळत असतो. आज नाही तर उद्या हे सगळे बदलेल, अशी आशा आपल्या भोळ्या मनाच्या तळाशी असते. त्याच आशेवर माणूस जगत असतो. कधी कधी ही परिस्थिती नाकारण्याकडे आपला कल असतो. पण जेव्हा हीच परिस्थिती कुणीतरी आपल्या समोर साकार करून आपल्याला या सगळ्या परिस्थितीचे बीभत्स दर्शन घडवतो, तेव्हा आपण आतून ढवळून निघतो. ‘हे असे घडू नये’ असे आपले संवेदनशील मन आक्रंदत असते, जरी आपल्या अवतीभवती असेच रोज घडत असले तरीही. आपल्याला शोकांतिका अव्हेरून सुखांतिका हवी असते. पण तसे न करता कुशल लेखक हा आपल्याला भळाळणारी सामाजाची जखम उघडी करून दाखवतो व आपण स्वस्त, अस्वस्थ होऊन रसिक प्रेक्षकाला अस्वस्थतेच्या गर्तेत ढकलतो. तसाच काहीसा अनुभव या नाटकाच्या शेवटच्या टप्प्यात बहुतेकांना आला असावा.

मिलिंद बर्वे लिखित ‘देवा म्हाराजा’ या नाटकाचा विषय अन् आषय वर्तमानकाळाला तर साजेसा आहेच पण तो त्रिकालाधीतहीआहे. ‘ओएमजी’ या सिनेमात एक संवाद आहे. “लोकांकडून त्यांचा देव काढून घेऊ नका, ते तुम्हालाच देव बनवतील.” या सिनेमाची कथा विज्ञाननिष्ठेच्या कार्यकारण भावाच्या आसपास फिरते. लोकांना विचार करायला भाग पाडते. तसेच काहीसे मिलिंद बर्वे यांच्या ‘देवा म्हाराजा’त होते. कुढल्याही नव्या विचाराला देवत्व देऊन त्याला संपवून टाकण्याच्या अनेक कथा आपल्या इतिहासात आपल्याला भेटतात. त्या संत महंतांची शिकवण बाजूला ठेवून त्यांना रोज भजावे एवढेच हाती घेऊन लोक पुण्य कमवायला निघतात. कसदार भाषा अन् ठोस संकल्पना यातून अवतरलेले प्रभावी संवाद, सोबत वेशभूषा अन् प्रकाशयोजनेचे अप्रतिम दर्शन, त्यात संगिताची लयबद्ध साथ सगळेच एकमेकाला पूरक ठरले अन् एक अप्रतिम कलाकृती सादर झाली.

“कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का? एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतंय. जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय. कुणी घर देता का घर?” असा

संवाद ‘नटसम्राट’ नाटकामधला सुमारे २८ वर्षांअगोदर आपल्या कोवळ्या वयात भावोत्कटपणे सादर करून पूर्ण गावातील अबालवृद्धांचे डोळे पाणावत थेट त्यांच्या काळजाला हात घालणारा इवलासा अकरावीचा मुलगा नितीन शिवराम नाईक. तो पोरगेलासा बुटकासा मुलगा आज यशस्वी दिग्दर्शक, अभिनेता, नाटककार म्हणून पुढे आलेला बघून खूप कौतुक वाटते. हंस नाट्य थिएटरमार्फत ज्येष्ठ नाटककार विजयकुमार नाईक यांच्या परिसस्पर्शाने नाट्य क्षेत्रातल्या पिढ्या घडवल्या. त्याच परिसस्पर्शाने नितीन घडला अन् आज नितीन शिवराम नाईक दिग्दर्शित एकापेक्षा एक अशी सरस नाटके रसिकांना पर्वणी ठरत आहेत. नितीनचा नाटकाविषयीच्या ज्ञानाचा चढता आलेख कुणाही त्याच्या हितचिंतकाला सुखावणारा आहे. त्याच्या दिग्दर्शनाने या संहितेला सोनेरी बनवले आहे. चांगला विचार संपवण्याचा प्रयत्न करणारे करीत आहेत अन् चांगला विचार रुजवणारे रुजवीत आहेत. अनंत काळापासून हे चालत आलेले आहे.

कच्छ भद्रेश्वर गुजरातच्या सागरशाळेची मुले आपल्या दोन एकांकिका घेऊन गोव्यात याच महिन्यात येऊन गेली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सगळ्या धर्मांचे सार घेऊन प्रेमाच्या धर्माचा प्रसार करणाऱ्या साने गुरुजींची एकशेपंचवीसावी जयंती यंदा २४ डिसेंबरला पूर्ण भारतात साजरी झाली. त्यानिमित्त ‘श्यामकी माँ’ आणि ‘सभी को बंधू माने हम’ या दोन एकांकिका गुजरात राज्यात अनुक्रमे पहिली व तिसरी आली होती. त्याचे प्रयोग कला व संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात झाले.

दोन दिवस अगोदर दक्षिण गोव्यात भव्य सभा घेऊन विष ओकणाऱ्या, समाज विघातक विचारांचा प्रसार करण्यासाठी हजारोंचा जथ्था निघाला होता. आपल्यासम इतर माणसांविषयी द्वेश पसरविण्याच्या या झगमगाटात श्मामची आई आपल्या बाळासहीत गोव्यातील इतर शालेय मुलांना मानवता, बंधूता व प्रेम करण्याचा धर्म शिकवताना नवविचारांची एक पणती त्यांच्या हाती देत होती.

या झगमगाटात दिपून देवस्थान समितीचा अल्पसंख्यांक समाजावर जत्रेपुरता बहिष्कार घालणारा निर्णय वाचनात आला. आपल्या कपड्यांपासून ते खाण्यापासून, आपण वापरत असलेल्या पेट्रोलपासून ते सोन्यापासून सगळेच आपले अल्पसंख्यांक बंधू आपल्याला पुरवत आहेत. तरीही आपल्या सोयीप्रमाणे प्रत्येकजण आपली धोरणे ठरवत असतात. त्याचा आपल्या मिळून मिसळून राहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याची सगळीकडून टीका झाली. काही लोकांनी आपले वेगवेगळे अजेंडा पुढे ढकलायला सुरवात केली. त्यातून सहिष्णू गोव्याचे वातावरण गढूळ होतेय असे जाणवत असतानाच देवस्थान समितीचा कार्यालयीन निर्णय जिल्हाधिकऱ्यांसमक्ष समोर आला की असा कोणताही बहिष्कार समितीने घातलेला नाही. या निर्णयाचे सद्सद्विवेक बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंत लोकांनी स्वागत केले तसेच साध्या भावार्थी लोकांनीही स्वागत केले. चांगल्या विचारांना मारण्याची प्रक्रिया जशी चिरंतन आणि वेदनादायी आहे तशीच चांगल्या विचारांच्या उदयास देर असेल पण अंधेर नाही हे या गेल्या महिन्याभराच्या उलथापालथींनी दाखवून दिलेले आहे.

गोव्यात वर्षाचा शेवट सगळ्या कला आणि संस्कृतीच्या उत्थानासाठी महत्वाचा असतो. सेरेंडिपिटी, आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नाट्य स्पर्धा, महाविद्यालयीन स्पर्धा, प्रत्येक शैक्षणिक संस्थेचे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, या सगळ्यातून हा वर्षाअखेरचा काळ व्यापलेला असतो. त्यात भर म्हणजे गावागावातले काले, जत्रा, अन् कुडकुडणारी थंडी. एकूणच या काळात कलेला व रसिक मनाला बरीच मेजवानी असते. या सगळ्याचा आविष्कार व आस्वाद घेताना आपल्या मनात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होऊ नये. आपले विषय अन् सादरीकरण राजकीय, धर्मांध अजेंडा पुढे नेणारे नसून, आपण सगळी प्रभूची लेकरे आहोत व समस्ताला बंधू मानून आपण सगळ्यांवर प्रेम केले पाहिजे, हा संस्कार रुजवणारे हवेत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा साने गुरुजींचा धर्म अंगिकारूया अन् आपल्यासह इतरांनाही व्यक्त होण्याचा, जगण्याचा अधिकार आहे, हे समजून त्याचा आदर करूया.


- नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक आहेत.)