शिवोली येथील व्हिलातून ऐवज लंपास

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th March, 12:28 am
शिवोली येथील व्हिलातून ऐवज लंपास

म्हापसा : मार्ना शिवोली येथील एका व्हिलाच्या बेडरूमच्या खिडकीची जाळी कापून अज्ञात चोरांनी सुवर्णलंकार व रोख रक्कम मिळून १४.७६ लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही चोरीची घटना बुधवारी उत्तर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० या कालावधीत घडली. या प्रकरणी सार्थक राजेशकुमार गुप्ता यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या चोरीच्या घटनेवेळी फिर्यादींचे पालक व्हिलामध्ये झोपले होते. त्यांना या चोरीच्या प्रकाराची चाहुलही लागली नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.

अज्ञात चोरांनी या व्हिलाच्या पहिल्या मजल्यावर चढून एका बेडरूमच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडली व आत प्रवेश केला. घरात कपाटामध्ये ठेवलेले ११ लाख ६१ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे सुवर्णलंकार आणि ३ लाख १५ हजार रुपयांची राेख रक्कम लंपास केली.