'पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर मनात घोंघावत होते आत्महत्येचे विचार..' जो बायडन यांचा खुलासा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
27th April, 03:32 pm
'पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर मनात घोंघावत होते आत्महत्येचे विचार..'  जो बायडन यांचा खुलासा

वॉशिंग्टन: जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकत्याच हावर्ड स्टर्न यांना दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. या दरम्यान त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीचा अपघाती मृत्यू, एकल पालकत्व, कामाचा ताण आणि नैराश्य यांवर चर्चा केली. मुलाखत चालू असतानाच त्यांनी पत्नी आणि मुलीच्या अपघाती मृत्यूचा विषय काढत, त्यावेळी आपण नैराश्येच्या गर्तेत पुरता बुडालो होतो असे सांगितले. याचवेळी आपण डेलावेअर ब्रिजवरुन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता होता असेही ते म्हणाले. 

बायडन हे अमेरिकेतील सर्वात ज्येष्ठ राजकारण्यांपैकी आहेत. त्यांनी १९७२ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. याच निवडणुकीमध्ये विजय मिळवत सिनेटर म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा श्री गणेशा केला होता. मागील ५२ वर्षांपासून राजकारणात असणारे बायडन यांनी आपल्या आयुष्यातील अनेक पैलू या मुलाखतीदरम्यान उलगडले. 

१९७२ साली नाताळच्या सुट्ट्यांमध्ये खरेदी करुन घरी येत असतानाच बायडन यांची ३० वर्षीय पत्नी निलिया आणि १३ महिन्यांची मुलगी नाओमी यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचे दोन मुलगे हंटर आणि बाओ हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते. "मी आत्महत्येसंदर्भात विचार केला होता.  डेलावेअर  मेमोरीयल ब्रिजवर जाऊन तिथून नदीत उडी टाकून सगळे संपवून टाकावे असा विचार माझ्या मनात आला होता," असे बायडेन यांनी हावर्ड स्टर्न यांच्याशी बोलतांना सांगितले. मात्र ते फक्त विचारच होते. मी कधी यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही, असेही बायडेन म्हणाले.

त्या घटनेनंतरचा एक प्रसंग आठवताना बायडन म्हणाले, "मी कधीच ड्रिंक्स घेत नाही. मात्र त्या दिवशी मी बरेच मद्यपाशन केले होते. मात्र माझ्या मुलांमुळे यामधून मी सावरलो,"  २०१५ मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचे ब्रेन कॅन्सरमुळे निधन झाले. बायडन यांनी आयुष्यामध्ये अनेक संकटांना तोंड दिले आहे. अनेकदा त्यांना यामध्ये खूप मानसिक त्रासही झाला आहे. आपल्या रॅली आणि सभांमध्ये ते अनेकदा मानसिक आरोग्यासंदर्भात बोलतात. 

हेही वाचा