धारगळमध्ये बसून आयपीएलवर सट्टेबाजी; दोन गुजराती तरुणांना ठोकल्या बेड्या

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेची कारवाई; १.५० लाखाचा मुद्देमाल जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 03:42 pm
धारगळमध्ये बसून आयपीएलवर सट्टेबाजी; दोन गुजराती तरुणांना ठोकल्या बेड्या

‍म्हापसा : ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामान्यावर शिरगाळ-धारगळ येथे एका बंद खोलीत बसून सट्टेबाजी करणाऱ्या दोन गुजराती तरुणांना गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून १.५० लाखाचा मुद्देमालही जप्त केला. त्यानंतर सकाळी त्यांना जामिनावर मुक्त केले.

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेचे निरीक्षक राहुल परब यांना शिरगाळ-धारगळ येते आयपीएलवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर आणि कर्मचाऱ्यांसह काल रात्री ९.१० ते ११ वाजण्याच्या सुमारास शिरगाळ येथील ‘दुर्वा’ नामक बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर छापा टाकला. यावेळी संशयित प्रतीक रा. विनुभाई कोरात (२९, रा. सुरत) आणि मिहीरभाई नटुभाई परमार (२९, भावनगर) हे मूळ गुजरातमधील दोन तरुण सट्टा घेत असल्याचे त्यांना आढळून आले.

‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या काल सायंकाळी ७.३० वा. सामना रंगला होता. याच क्रिकेट स्पर्धेवर दोघेजण सट्टाबाजी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पोलिसांनी लगेच दोघांना अटक करून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे साहित्य मिळून अंदाजे १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर आज सकाळी त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. या दोघांच्या चौकशीत आणखी एकजण यात गुंतल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.