वाळपईच्या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या जीवाला धोका!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 03:20 pm
वाळपईच्या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या जीवाला धोका!

वाळपई : येथील शहराजवळील पोलीस कर्मचाऱ्यांच्या जुन्या इमारतीमध्ये सध्या परप्रांतीय मजूर वास्तव्य करीत आहेत. शेजारी चालू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानाच्या बांधकामात हे मजूर काम करत आहेत. ही इमारत अत्यंत धोकादायक असून कधीही कोसळू शकते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याआधी या मजुरांना इमारतीतून हटवावे, अशी सूचना स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेला केली आहे.

जुनी इमारती धोकादायक बनल्याने दहा वर्षांपूर्वीच पोलीस कर्मचाऱ्यांचे स्थलांतरण करण्यात आले होते. त्यामुळे दहा वर्षांपासून ही इमारत विनावापर आहे. इमारतीचा काही भाग आधीच कोसळलेला आहे. इमारतीच्या भिंती अत्यंत कमकुवत बनलेल्या आहेत. इमारतीचे  छप्पर कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. असे असतानाही उद्यानाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने परप्रांतीय कामगारांची व्यवस्था या इमारतीमध्ये केलेली आहे. हे परप्रांतीय कामगार सहकुटुंब या इमारतीत राहत आहेत. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यासोबत लहान मुलेही आहेत. याकडे स्थानिक पोलीस व मामलेदार कार्यालय व पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे स्थानिकांनी म्हटले आहे.