दिगंबर, मायकल यांच्याविरुद्धची काँग्रेसची अपात्रता याचिका सभापतींनी फेटाळली

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
09th May, 04:41 pm
दिगंबर, मायकल यांच्याविरुद्धची काँग्रेसची अपात्रता याचिका सभापतींनी फेटाळली

पणजी : कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केलेली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली.

राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापन करण्यास सांगितले. डाॅ. प्रमोद सावंत यांनी ‘मगो’ आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर ९ जुलै २०२२ रोजी आमदार लोबो आणि १० जुलै २०२२ रोजी आमदार कामत यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

वरील प्रकारानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी सभापतीकडे याचिका दाखल करून लोबो आणि कामत यांना अपात्रता करण्याची मागणी केली होती. याच दरम्यान १४ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेसच्या मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस या आठ आमदारांनी पक्षांतर करत दोन तृतियांश विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी वरील आठ आमदारांना अपात्रता करण्याची याचिका सभापतीकडे दाखल केली होती. याशिवाय प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी ९ डिसेंबर २०२२ रोजी आणखीन एक याचिका दाखल करून वरील आठ आमदारांना अपात्रता करण्याची मागणी केली. तसेच एका नागरिकानीही या आठ आमदारांना अपात्रता करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सभापतीने आमदार लोबो आणि कामत याच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी दाखल केलेली याचिकेची सुनावणी घेतली. यावेळी पाटकर यांच्यातर्फे अॅड. अभिजीत गोसावी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. गुरुप्रसाद नाईक यांनी सहकार्य केले. तर लोबो आणि कामत यांच्यातर्फे अॅड. पराग राव यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. अखिल पर्रीकर यांनी सहकार्य केले.

‘गोवा विधानसभा नियमन १९८६’ (पक्षांतराच्या आधारावर अपात्रता) या नियमांअंतर्गत अपात्रता करण्यासाठी संबंधित पक्षाच्या विधीमंडळ नेत्यांनी विधानसभा स्थापन झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत सभापतींना यादी देणे बंधनकारक आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने तसे केले नाही. याशिवाय पाटकर यांनी दुसरी याचिका दाखल करून आमदार लोबो आणि कामत यांच्यासह आठ जणांना अपात्रता करण्याची मागणी केली आहे. वरील आवश्यक यादी सादर केली नसल्याचे निरीक्षण नोंदवून सभापती रमेश तवडकर यांनी आमदार मायकल लोबो आणि आमदार दिगंबर कामत याच्या विरोधात काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केलेली अपात्रता याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा