गिरीत उड्डाण पुलावर ‘द बर्निंग’ कारचा थरार! संपूर्ण कार जळून खाक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th April, 03:57 pm
गिरीत उड्डाण पुलावर ‘द बर्निंग’ कारचा थरार! संपूर्ण कार जळून खाक

गिरी येथील ग्रीन पार्क जंक्शनजवळील उड्डाण पुलावर आगीत जळणारी कार.

म्हापसा : गिरी येथील ग्रीन पार्क जंक्शन उड्डाण पुलावर धावत्या कारने पेट घेतल्याने खळबळ माजली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. ही दुर्घटना आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जीए-०३वाय-३८११ क्रमांकाची मारुती ओमनी कार घेऊन चालक महादेव मोरजकर (सांगोल्डा) हे गिरीहून तार बस्तोडा मार्गे म्हापसा बाजाराच्या दिशेने येत होते. महामार्गावरील ग्रीन पार्क उड्डाण पुलावर ही कार पोहोचताच अचानक इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाले व आगीने पेट घेतला. मोरजकर यांच्या हे लक्षात येताच त्यांनी लगेच कार घटनास्थळीच पार्क केली व ते खाली उतरले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. 

म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली स्वप्नेश कळंगुटकर, प्रवीण गावकर, संजू कोरगावकर व सनील बाणावलीकर या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. तोपर्यंत चारही चाकांसमवेत कारचा बहुतेक भाग जळाला होता.


हेही वाचा